पिंपरी (Pclive7.com):- बहुविध संस्कृतिने नटलेल्या भारतात विविध सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या सण उत्सवात संस्कृतिचे जतन करीत सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सार्वजनिक स्वच्छतेकडे आवर्जून लक्ष द्यावे. आपले घर, परिसर, गल्ली, गाव स्वच्छ ठेवावे असे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल असा विश्वास महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केला.
विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथील इंद्रायणी नदी घाटावर मंगळवारी आणि बुधवारी छटपूजेनिमित्त भव्य गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शनिवारी (दि.१०) महापौर राहुल जाधव यांच्या उपस्थितीत व विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी घाट परिसर स्वच्छ केला. स्वयंसेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापौर राहुल जाधव यांनी स्वत: श्रमदान केले. या वेळी धनंजय गुप्ता, शेखर गुप्ता, प्रमोद गुप्ता, अक्रम शेख, शामबाबू गुप्ता, रोहित प्रसाद, किरण गायकवाड, पृथ्वी प्रसाद, सत्यम गुप्ता, विकास गुप्ता, रोहिदास कराटे, राधेशाम गौतम आदी उपस्थित होते. विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मागील वर्षीप्रमाणे मोशीतील इंद्रायणी घाटावर छटपूजेनिमित्त भव्य गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रविवारी सुर्यषष्टी महाव्रत आरंभ महापूजा, सोमवारी छोटकी छट, मंगळवारी (दि.१३) सायंकाळी ५.३० वाजता सूर्यास्तावेळी आणि बुधवारी सकाळी ६.४५ वाजता सुर्योदयावेळी भव्य गंगाआरती होणार आहे.
छटपूजेचे महत्व सांगताना लालाबाबू गुप्ता म्हणाले की, सूर्याची उपासना करण्यासाठी छटपुजेचे व्रत केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याचे प्राचिन काळापासूनची सामाजिक धारणा आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे. गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील इंद्रायणी घाटावर भव्य गंगा आरती आणि पूजा, भजन, छट लोकगीत सादर करण्यात येणार आहेत. या धार्मिक उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group