

पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येतील कुणाल आयकॉन सोसायटीमागील १८ नंबर मिलिटरी रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. स्थानिक शेतकऱ्यांनी काही कारणास्तव गैरसमजुतीतून हा रस्ता बंद केल्याने साई पर्ल व अल्कोव सोसायटीसह परिसरातील इतर रहिवाशांच्या येण्या-जाण्यावर परिणाम झाला होता.

या समस्येबाबत अल्कोव व साई पर्ल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि रहिवाशांनी माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांची भेट घेऊन तक्रार मांडली होती. नागरिकांची गैरसोय लक्षात घेत नाना काटे यांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेतली.

काल रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास नाना काटे यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत स्थानिक शेतकरी, सोसायटीचे कमिटी सदस्य, सभासद आणि नागरिकांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत सर्वांशी सकारात्मक संवाद साधत त्यांनी प्रभावी मध्यस्थी केली.

या चर्चेनंतर सर्वांच्या सहमतीने बंद असलेला रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली समस्या मार्गी लागली असून स्थानिक नागरिकांनी नाना काटे यांच्या तत्परतेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. या वेळी स्थानिक शेतकरी तसेच अल्कोव व साई पर्ल सोसायटीचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group