११ हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळला मंदिर परिसर
पिंपरी (Pclive7.com):- पवनामाईच्या जलस्पर्शाने पवित्र झालेल्या आणि धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मोरया गोसावी मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सलग १६ वर्ष दिपोत्सव साजरा होतो हे कौतुकास्पद आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमांव्दारे धार्मिक-सांस्कृतिक वारसा नव्या पिढीकडून पुढे चालविण्यास मदत होते. पवना नदीतील पाणी प्रदुषित होत आहे. ते रोखण्यासाठी उपाययोजना करून पावित्र्य जपले पाहिजे. यासाठी शहरातील सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा चिंचवड देवस्थानचे माजी विश्वस्त विघ्नहरी देव महाराज यांनी व्यक्त केली.

संवेदना प्रतिष्ठान आणि चिंचवड देवस्थान संस्थान यांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त गुरुवारी सायंकाळी ६ वाजता चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी समाधी मंदिर येथे दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित भाविक, भक्तांनी ११ हजार दिवे लावले. यामुळे संपुर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. यावेळी दिपोत्सवाचे संयोजक आणि संवेदना प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सुर्यकांत ऊर्फ नाना थोरात, चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे, अंबर चिंचवडे, कैलास गावडे, नारायण लांडगे, ललित थोरात, सुरेश बेंद्र, कल्पना चिंचवडे, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर आदी उपस्थित होते.
देव महाराजांनी त्रिपुरारी पौर्णिमेची माहिती देताना म्हणाले, त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर ब्रम्हदेवाकडून मागून घेतला. या वरामुळे तो उन्मत्त होऊन सामान्य जनता आणि देवांनासुध्दा त्रास देऊ लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे होती. त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येत नव्हता. देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. त्रिपुरासुर आणि भगवान शंकर यांची लढाई सुरू झाली. परंतु युध्दापूर्वी श्री गणेशाची पुजा केली नसल्यामुळे त्रिपुरासुराचा पराभव होऊ शकत नाही, हे भगवान शंकराच्या लक्षात आले. त्यानंतर शंकराने गणेशाची पुजा केली आणि त्रिपुरासुराचा पराभव करत वध केला. हा दिवस म्हणजेच कार्तिक पौर्णिमा आणि म्हणूनच दुष्ट शक्तींचा नाश करून सद्विचार, चांगले कर्म करण्याची प्रेरणा मिळावी या हेतूने त्रिपुरारी पौर्णिमा दिपोत्सवाने साजरी केली जाते, असे देव महाराजांनी सांगितले.
प्रतिष्ठानचे संस्थापक सुर्यकांत तथा नाना थोरात यांनी प्रस्ताविकात दिपोत्सव साजरा करण्यामागील हेतू विषद केला. सुत्रसंचालन अंबर चिंचवडे, आभार सुरेश भोईर यांनी मानले. यावेळी भाविक, भक्त, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group