पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर, आयुक्तांबरोबर विरोधी पक्षनेत्यासह गटनेते देखील सहभागी झाले आहेत. बार्सिलोना येथे आयोजित केलेले ‘स्मार्ट सिटी चर्चासत्र’ संपुण चार दिवस झाले तरी अद्याप शिष्टमंडळातील सर्व प्रतिनिधी शहरात आलेले नाहीत. महापालिकेच्या खर्चाने होणारे असले खर्चिक परदेश दौरे म्हणजे नागरिकांच्या पैशावर टाकलेला सामुहिक दरोडाच आहे. या दौऱ्यातून काय निष्पन्न झाले याचा सविस्तर अहवाल महापौर, विरोधी पक्षनेते, सहभागी गटनेते, आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर मांडावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.
महापालिकेचे २१ लाख रुपये खर्च करुन बार्सिलोना येथे आयोजित केलेल्या स्मार्ट सिटीच्या चर्चासत्रासाठी महापौर राहुल जाधव, विरोधी पक्षनेते दत्ता साने, पक्षनेते एकनाथ पवार, गटनेते सचिन चिखले, प्रमोद कुटे, सह शहर अभियंता राजन पाटील, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्यासह दहा प्रतिनिधींचे शिष्टमंडळ गेले आहे. चर्चासत्र संपुण चार दिवस झाले तरी अद्यापही शिष्टमंडळाचे सर्व प्रतिनिधी शहरात आलेले नाहीत. वस्तु:ता विरोधी पक्षाने व इतर गटनेत्यांनी शहरातील नागरीकांना भेडसावणा-या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठविला पाहिजे. सत्ताधारी पक्ष बहुमताच्या जोरावर अनावशक खर्चिक प्रकल्पांवर जनतेच्या पैशाची लूटमार करीत असते तेंव्हा विरोधी पक्षांनी तीव्र विरोध करुन अशी चुकीची कामे थांबविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना भाग पाडले पाहिजे, अशी नागरीकांची अपेक्षा असते. परंतू या दौऱ्यात सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्ष देखील सहभागी झाल्यामुळे विरोधकांबाबत देखील अपेक्षाभंग झाला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून अवघ्या दिड वर्षांत पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी मनपाच्या खर्चाने देश परदेशात सोळा दौरे करुन ‘पर्यटनाचा आनंद’ उपभोगला. यापैकी एकाही दौऱ्याचा अहवाल सभागृहात मांडलेला नाही. बार्सिलोना दौऱ्यातील अहवाल आणि यापुढे मनपाचे लोकप्रतिनिधी व अधिकारी नागरीकांच्या पैशाने देश परदेशात दौऱ्यावर गेले, तर त्या दौऱ्याची फलनिष्पत्ती काय झाली याचा सविस्तर अहवाल पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर मांडावा अशीही मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.