पिंपरी (Pclive7.com):- गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारा ‘मुळशी पॅटर्न’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट शुक्रवारपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सुरूवातीपासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. आता प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट पुन्हा वेगळ्या वादात सापडला आहे. ‘मुळशी पॅटर्न’ पाहताना (दादा, भाऊ) तरूण प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात ‘धुडगूस’ घातला जात आहे. म्हणूनच चक्क पोलीसांना चित्रपटगृहात ‘मुळशी पॅटर्न’ सुरू होण्यापूर्वी दाखल होऊन अशा हुल्लडबाजी करणाऱ्या ‘दादा-भाऊं’ना शांतपणे चित्रपट पाहण्याची तंबी द्यावी लागत आहे.
बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मुळशी, हिंजवडी, माण परिसरातील चित्रीकरण या चित्रपटात करण्यात आल्यामुळे येथील तरूणांना याचे विशेष आकर्षण आहे. हिंजवडीतील मल्टिप्लेक्स सिनेमागृहात त्यामुळे ‘हाऊसफुल्ल’ची पाटी पहावयास मिळत आहे. परंतू या चित्रपटात
गुन्हेगारीचे उदात्तीकरण केले आहे. म्हणूनच तरूण वर्गाच्या पसंदीला हा चित्रपट उतरत आहे. मात्र हा चित्रपट पाहताना उपस्थित तरूण (दादा-भाऊ) प्रेक्षक चित्रपटगृहात प्रचंड गोंधळ घालत आहेत. म्हणूनच सिनेमागृह व्यवस्थापनाच्या मागणीवरून पोलीसांना पाचारण करावे लागले. त्यानुसार आज हिंजवडी येथे सुरू झालेल्या या चित्रपटाच्या ‘शो’पूर्वी पोलीसांनी हजेरी लावत हुल्लबाजी घालणाऱ्या प्रेक्षकांना सज्जड दम दिलाय. गोंधळ घालायचायं तर आपल्या घरी घाला. चित्रपट शांतपणे पहावा, त्याचा आनंद घ्या. कुठल्याही प्रकारची गुंडगिरी दाखवू नका. गोंधळ घातल्यास चित्रपट थांबविण्यात येईल असा दम देत दोन पोलीस सिव्हील ड्रेसमध्ये चित्रपटगृहात बसविण्यात आले.