पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीत एका कचरा वेचक महिलेला कचर्याच्या ढिगार्यात ४३ जिवंत काडतुसे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी पोलिसांनी सर्व काडतुसे जप्त केली आहेत. हा प्रकार गुरुवारी (दि.२२) रात्री चिंचवड येथे उघडकीस आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील एम्पायर इस्टेट या गृहप्रकल्पाजवळ रेल्वे लाईनलगत महिला कचरा गोळा करीत असताना तिला एक लाल रंगाची कापडी पिशवी दिसली. तिने पिशवीचे तोंड उघडून पहिले असता आतमध्ये ४३ जिवंत काडतुसे असल्याचे दिसून आले. जिवंत काडतुसे पाहून महिला घाबरली होती. तिने याबाबत तात्काळ पिंपरी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता पिशवीमध्ये एकुण २६ जिवंत काडतुसे त्यावर इंग्रजीमध्ये के. एफ.९९ असे लिहिलेले आहे. तर १० नग सिल्व्हर रंगाचे बाराबोअर २.२ त्यावर इंग्रजीमध्ये मेड इन बेल्जीअम १२ असे लिहिलेले आहे. ०७ नग लाल रंगाचे बाराबोअर त्यावर इंग्रजीमध्ये वेस्टर्न सुपर नं १२ मेड इन युएसए असे लिहिलेले आहे. असे एकूण ४३ जिवंत काडतुसे त्या पिशवीत मिळून आली आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ही काडतुसे रेल्वेतून फेकली गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहेत.























Join Our Whatsapp Group