पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते स्वराज गार्डन चौक दरम्यान होणाऱ्या लिनिअर अर्बन गार्डनला नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मलाताई कुटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज लिनियर अर्बन गार्डन नाव देण्याची मागणी केली होती. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या समोर हा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव आज शत्रुघ्न काटे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. या भव्य अशा उद्यानाला ‘छत्रपती शिवाजी महाराज लिनिअर अर्बन गार्डन’ नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपळे सौदागरमधील कोकणे चौक ते स्वराज गार्डन दरम्यान पावणेदोन किलोमीटर परिसरात लिनिअर अर्बन गार्डनचे काम सुरू आहे. या गार्डनमध्ये महाराष्ट्र राज्यातील पहिले सन डायल प्लाझा साकारण्यात येणार आहे. जमिनीला समांतर अशा घड्याळाची प्रतिमा तयार करून मध्यभागी व्यक्ती उभी राहिली असता सूर्याची किरणे त्यावर पडून त्या व्यक्तीची सावली खाली घडयाळाच्या ज्या अंकावर पडते त्यानुसार वेळेचा अंदाज येतो. सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करतो त्याप्रमाणे प्रतिमेच्या सावलीवरून वेळेचे आकलन करता येते, अशी या सन डायलची रचना असणार आहे. अशी संकल्पना साकारणारे पिंपळे सौदागरमधील लिनिअर अर्बन गार्डन महाराष्ट्र राज्यातील पहिलेच उद्यान आहे. पिंपरी चिंचवड शहरवासीयांसाठी हे सन डायल प्लाझा एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
तसेच लिनियर गार्डनमध्ये साकारण्यात येणाऱ्या अॅम्पिथिएटर आणि स्केटिंग प्लाझा या वास्तूंविषयीही माहिती दिली आहे. अॅम्पिथिएटर म्हणजे ओपन रंगमंदिर असते. हे अंडाकृती असून केंद्रस्थानी जागा मोकळी असते आणि बाजूने नागरिकांना बैठक व्यवस्था केलेली असते. या अॅम्पिथिएटरचा उपयोग सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन कार्यक्रम तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून करण्यात येईल. तर प्रभागातील इच्छुक नागरिकांना स्केटिंगचा लाभ घेता यावा यासाठी या उद्यानात स्केटिंग प्लाझा विकसित करण्यात येणार आहे.
पिंपळे सौदागर हा शहरातील सर्वाधिक वेगाने विकसित झालेला परिसर आहे. या भागात देशातील कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक राहतात. या भागातील प्रशस्त रस्ते, सोयीसुविधांचा शहराच्या अन्य भागातील नागरिकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यामुळेच वैविध्यपूर्ण संकल्पनांवर आधारित असलेले हे पर्यावरणपूरक उद्यान आपले ड्रीम प्रोजेक्ट असून सध्या या उद्यानाचे काम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. तसेच या उद्यानाचे काम वेगाने पूर्ण करून लवकरात लवकर ते नागरिकांसाठी खुले करण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणूनच या उद्यानाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी आपण केली होती असे शत्रुघ्न काटे यांनी म्हटले आहे.
























Join Our Whatsapp Group