पिंपरी (Pclive7.com):- सूर्य डोक्यावर आग ओकत होता…, आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लगबग…, अशात एक गर्भवती महिला प्रसूती वेदनेने विव्हळत होती. ती मदतीसाठी मोठ्या अपेक्षेने लोकांकडे बघत होती. मात्र, तिच्याकडे पहायला कोणालाही वेळ नव्हता. तीव्र उन्हामुळे जणू माणुसकीही करपली होती. या महिलेची तडफड पाहून रेल्वे स्थानकावरील रेल्वे स्टेशन मास्टरला माणुसकीचा पाझर फुटला. त्यांनी तत्काळ मदतीची सूत्रे हलविल्याने महिलेसह तिच्या बाळाला जीवदान मिळाले.
आकुर्डी रेल्वे स्थानकामध्ये गुरुवारी (दि.१६) भर दुपारी एक गर्भवती महिला प्रवासाच्यानिमित्ताने आली होती. मात्र अचानकच पोटात दुखायला सुरुवात झाली. या वेदना प्रसूतीच्या असल्याचे तिच्या लक्षात आले. यासाठी ती अनेकांकडे मदतीच्या नजरेने बघत होती. परंतु, तिच्या मदतीला कोणीही पुढे आले नाही. तेथेच तिची प्रसुती झाली. या महिलेची परिस्थिती पाहून आकुर्डी स्टेशन मास्तरांनी समयसूचकता दाखवली. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या गंगानगर आकुर्डी विभागाचे प्रमुख पोलीस मित्र संतोष चव्हाण यांना तातडीने बोलावून घेतले.
चव्हाण यांच्या सोबत समितीचे विजय पाटील, अमित डांगे व महिला विभागाच्या अर्चना घाळी-दाभोळकर यांनी त्वरित आकुर्डी रेल्वे स्थानकावर धाव घेतली. रुग्णवाहिका बोलावून महिला व बाळाला घेवून तातडीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनीही महिलेची व जन्मलेले बाळाची तपासणी करुन महिला व बाळ सुस्थितीत असल्याचे सांगितले.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले की, समितीचे सजग कार्यकर्ते आणि स्टेशन मास्तर यांच्या मदतीमुळे गर्भवती महिलेस तातडीने वैद्यकीय मदत मिळाली. प्राधिकरण आकुर्डीसारख्या उच्चभ्रू परिसरातून हजारो प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करत असतात. मात्र, कोणीही या महिलेला मदत केली नाही.
























Join Our Whatsapp Group