पुणे (Pclive7.com):- पुणे महापालिका निवडणूक काही महिन्यांवर आली असताना पक्षांतर करण्याचे वारे वाहू लागले आहे. सत्तेची आगामी गणिते लक्षात घेऊन इच्छूक उमेदवारांनी पक्षांतर सुरु केले आहे. सर्वाधिक इनकमिंग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुरू असून आज मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे स्वागत केले. यावेळी माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक बंडूभाऊ केमसे, नगरसेवक सुभाष जगताप, रुपाली ठोंबरे व अभय मांढरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्या विचारांवर निष्ठा दाखवून जयश्री मारणे या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात दाखल झाल्या आहेत. येत्या काळात शहरातील अनेक मातब्बर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसतील, असे सूचक विधान शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.