पिंपरी (Pclive7.com):- एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मिळकतधारकांच्या मिळकत जप्तीसोबत नळजोड तोडण्याची कारवाई महापालिकेने तीव्र केली आहे. आतापर्यंत ३२९ मिळकतींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी १९३ मिळकती सील करण्यात आल्या असून, त्यापैकी ६० जणांचे नळजोड तोडण्यात आले आहेत.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20220220-WA0007-300x300.jpg)
कर संकलन विभागाने मार्च महिन्यात वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. विभागाने एकूण ४४२ मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीचे नियोजन केले आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण ३२९ मिळकतींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी १९३ जणांनी थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरणा केला आहे. ती एकूण रक्कम १३ कोटी ८१ लाख ५० हजार ५३५ इतकी आहे. तर, १३८ मिळकतींना सील लावण्यात आले असून, काहींचे नळजोडही तोडण्यात आले आहेत.
थकबाकीदारांमध्ये वर्कशॉप, कंपन्या, मोबाईल टॉवर व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे दीड लाख ते २४ लाखांपर्यंत थकबाकी आहे. सील करण्यात आलेल्यांमध्ये चिखली विभागीय कार्यालय क्षेत्रातील सर्वाधिक ८९ मिळकती आहेत. सांगवीतील १३, थेरगावातील १२, निगडी, प्राधिकरणातील ६, आकुर्डीतील व महापालिका भवन येथील प्रत्येकी ५, चिंचवड व मोशी मधील प्रत्येकी ३ आणि भोसरीतील २ मिळकती सील केल्या आहेत.
थकबाकीसह संपूर्ण बिल भरून कारवाई टाळा
महापालिकेच्या १६ कर संकलन कार्यालयाकडून थकबाकीदारांकडून वसुली मोहिम कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत एकूण ४७२ कोटी ३७ लाखांचा एकूण मिळकतकर जमा झाला आहे. नागरिकांनी थकबाकीसह मिळकतकर भरून जप्ती कारवाई तसेच, विलंब दंड टाळावा, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.