पिंपरी (Pclive7.com):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शिकावे, संघटित व्हावे या मुलमंत्राचे सर्वांनी आचरण केले पाहिजे. शिक्षणातूनच प्रत्येकाला जीवनातील ध्येय साध्य करता येईल असे प्रतिपादन माजी महापौर व नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर यांनी केले.
भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहराध्यक्ष संतोष जोगदंड यांनी शुक्रवारी नेहरुनगर पिंपरी येथील राजीव गांधी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत वही वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भारिपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, डॉ. छाया शिंदे, भारिप युवक आघाडी पुणे शहराध्यक्ष विकास साळवे, माजी नगरसेवक अंकुश कानडी, शिक्षणाधिकारी पराग मुंडे, मुख्याध्यापक एच.बी.दळवी, दिलीप जाधव, एस.व्ही. गिरी, कक्ष अधिकारी सुजाता गोळे, भारिप मार्गदर्शक फुलचंद जोगदंड, मावळ तालुका भारिप अध्यक्ष माऊली सोनवणे, भारतीय बौध्द महासभा विठ्ठलनगर माजी अध्यक्ष उत्तम जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, तुकाराम गायकवाड, गुलाब पानपाटील, विष्णु सरपते, भैय्यासाहेब मिसळे, निशिकांत भालसैन, बाळासाहेब भालसैन, विठ्ठलराव ओव्हाळ, अक्षय साळवे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारिप शहराध्यक्ष देवेंद्र तायडे म्हणाले की, संतोष जोगदंड हे याच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. आपल्या व्यवसायात स्थिर स्थावर झाल्यानंतर मागील अकरा वर्षांपासून ते दरवर्षी या शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतात. ज्या शाळेत आपण शिकलो, त्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे हि त्यांची कृतज्ञता कौतुकास्पद आहे. यातून आगामी काळात मोठे समाजसेवक, उद्योजक घडतील व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पुर्ण होईल. या शिक्षण कार्यात संतोष जोगदंड प्रमाणे सर्वांनी पुढाकार घ्यावा यातूनच उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना मदत होईल. भविष्यात हेच विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शासनाच्या निर्णय प्रक्रियेतील उच्च अधिकारी असतील. असा आशावाद तायडे यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक व स्वागत करताना संयोजक संतोष जोगदंड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे गरीबीत जन्म घेणे हे चूक नाही, पण गरीबीतच मरणे हे चुकच आहे. या गरीबीवर यशस्वीपणे मात करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. मी स्व:ता या शाळेतून शिक्षण घेतले आहे. गरीब व उपेक्षित, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून उद्योजक संजय गायकवाड यांच्या सारखे मदतीचे हात पुढे येत असतात. त्यांच्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधण्याचे काम मी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून करीत आहे. ‘देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे, घेता घेता घेणा-याचे हात घ्यावे!’ या प्रमाणे यावर्षी देखील दोनशे विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक डझन फुलस्केप वह्यांचे वाटप केले आहे. आगामी काळात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आपण शालेय व उच्च शिक्षणासाठी हुशार विद्यार्थी दत्तक घेण्याचा मानस आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योजक व संस्थानी मदत करावी असेही आवाहन संतोष जोगदंड यांनी केले.
























Join Our Whatsapp Group