पिंपरी (Pclive7.com):- आळंदी परिसरात गुरुवारी उघडकीस आलेल्या सहा वर्षीय चिमुकली आणि ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या दुहेरी हत्याकांडाचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी विनायक तुकाराम भवारी (वय ३१) या आरोपीला आळेफाटा येथून अटक करण्यात आली आहे.

मृतांमध्ये धनश्री केदारी (वय ६) आणि शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७०) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनश्रीची आई संगीता केदारी या गुरुवारी रात्री कामानिमित्त हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. त्यामुळे धनश्री शेजारील मंगल शिंदे यांच्याकडे थांबली होती. रात्री उशिरा आरोपी विनायक भवारी तेथे आला. पत्नीला आपल्या विरोधात भडकवले जात असल्याच्या संशयातून संतापलेल्या आरोपीने प्रथम मंगल शिंदे यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांची हत्या केली. त्यानंतर ओळख पटेल या भीतीने त्याने चिमुकल्या धनश्रीचा उशीने तोंड दाबून खून केला.

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक कसबे आणि उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. तो आळेफाटा येथे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
दरम्यान, संगीता केदारी आणि आरोपी विनायक भवारी यांचा दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून परिचय होऊन प्रेमविवाह झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून दोघांमध्ये वाद सुरू असल्याने आरोपी वेगळा राहत होता. या वादातूनच त्याने हे भीषण कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे आळंदी परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





















Join Our Whatsapp Group