पिंपरी (Pclive7.com): पिंपरी-चिंचवड शहरातील सायकलिंगप्रेमी, सायकलपटू आणि स्वयंसेवकांनी एकत्र येत CSPC – सायकल संघ पिंपरी-चिंचवड या नव्या संघटनेची स्थापना १ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश असून, विशेषतः तरुण पिढीसह सर्व वयोगटांमध्ये सायकलिंगचे महत्त्व रुजवण्याचा संकल्प यामागे आहे.

संघटनेचा अधिकृत शुभारंभ, लोगो अनावरण आणि जर्सी प्रदर्शनाचा कार्यक्रम प्राधिकरण येथील स्वातंत्रवीर सावरकर सदनमधील कॅप्टन कदम सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला Indo Athletics Society (IAS) चे संस्थापक अध्यक्ष आणि सॉफ्टवेअर अभियंता गजानन शिवाजीराव खैरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते लोगो व जर्सीचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना खैरे यांनी CSPC संघटनेला शुभेच्छा देत सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच उपस्थित सायकलपटूंना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र विश्वनाथ पेंडसे यांचीही उपस्थिती होती. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. संघटनेच्या स्थापनेमागील उद्दिष्टे व आगामी उपक्रमांविषयी उमेश एकनाथ कुटे यांनी माहिती दिली. “जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होत स्वतःचे आरोग्य सुधारावे आणि पुण्याची ‘सायकलचे शहर’ ही ओळख पुन्हा मिळवावी,” असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक CSPC चे लिड ऑर्गनायझर रवींद्र होनराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन अतुल सुबंध यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने सायकलपटू व सायकलप्रेमी उपस्थित होते.
पहिला उपक्रम: १०० किमी सायकल रेस..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त CSPC तर्फे पहिली १०० किलोमीटर सायकल रेस रविवारी (५ एप्रिल २०२६) आयोजित करण्यात आली आहे. ही रेस चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदिर ते थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिर या मार्गावर पहाटे ४.३० वाजता होणार असून, सुमारे १०० सायकलपटू यात सहभागी होणार आहेत. या रेसला पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय चौबे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे.





















Join Our Whatsapp Group