– बाळासाहेब जवळकर –
पिंपरी (Pclive7.com):- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’….एक असे नाव, जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि घराघरात पोहोचले आहे.
जगभरात जिथे कुठेही मराठी माणसाचे वास्तव्य असेल, तिथे हास्यजत्रेची मोहिनी पडलेली आहे.
ताणतणावाने भरलेल्या आजच्या युगात मनमुराद, खळखळून हसणे ही मनुष्य जीवनातील सर्वात महत्त्वाची गरज आहे. ती पूर्ण करण्याचे काम जर कोणत्या कार्यक्रमातून प्रभावीपणे होत असेल, तो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’..

‘सोनी मराठी’ वाहिनीवर १९ ऑगस्ट २०१८ रोजी अर्थात आठ वर्षापूर्वी सुरू झालेली आणि प्रारंभापासूनच लक्षवेधी ठरलेली ही मालिका आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. विनोदाचे विविध प्रकार, दर्जेदार, फसलेले तसेच विसंगतीतून निर्माण झालेले विनोद, अतिशयोक्तीपूर्ण विनोद, समाजातील वास्तव, विसंगती, सद्यस्थितीवर केलेले सूचक भाष्य, दैनंदिन आयुष्यातील साधे प्रसंग- घटना, कौटुंबिक तथा नातेसंबंधातील गमती-जमती…अशा कितीतरी विषयांवर हलक्या-फुलक्या पध्दतीने, अभ्यासपूर्ण मांडणी करतानाच प्रेक्षकांना अंतर्मुख करण्याचे काम हास्यजत्रेने केले आहे.
सद्यस्थितीत केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगभरातील मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि अमराठी प्रेक्षकांनाही भुरळ घातलेल्या हास्यजत्रेने एक हजार भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. दूरचित्रवाहिनी विश्वातील ही अभूतपूर्व कामगिरी आहे. इथपर्यंत पोहोचणे सोपे काम नाही, ते केवळ आकड्यांचे गणित नाही. त्यामागे अथक, सांघिक परिश्रम आहेत. निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलावंत, तंत्रज्ञांसह प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावणाऱ्या संपूर्ण टीमचे हे यश आहे.
हास्यजत्रा परिवाराचे प्रमुख अर्थात ‘कॅप्टन ऑफ द शिप’ दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटे आहेत. ‘वेटक्लाऊड प्रॉडक्शन’मार्फत मोटे आणि गोस्वामी यांनीच या हास्यमालिकेची निर्मिती केली आहे. कार्यक्रमाची लोकप्रियता वाढवत नेत त्याचा दर्जा टिकवून आजपर्यंतचा प्रवास करणे आव्हानात्मक होते, ते त्यांनी लीलया पार पाडले आहे.
समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, प्रभाकर मोरे, अरूण कदम, नम्रता संभेराव, वनिता खरात, प्रियदर्शिनी इंदलकर, ईशा डे, रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, चेतना भट, श्याम राजपूत, पृथ्वीक प्रताप, रोहीत माने, ओमकार भोजणे, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर, श्रमेश बेटकर, मंदार मांडवकर, हेमंत पाटील, दत्तू मोरे, निखील बने, विराज जगताप… अशा सर्व कलावंतांनी हास्यजत्रेची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. यापूर्वीही विशाखा सुभेदार, अंशुमन विचारे, पंढरीनाथ कांबळे, गौरव मोरे, निमिष कुलकर्णी अशा अनेकांनी हास्यजत्रेचा रंगमंच गाजवला आहे. विनोदाचे टायमिंग, सहज अभिनय, अचूक संवादफेक..यातून प्रत्येक स्किट वाजवण्याचा कलाकारांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यांचे विनोद स्मितहास्य ते हास्याचा गडगडाट निर्माण करतात. धूमाकूळ घालणे म्हणजे काय, हे हास्यजत्रेच्या मंचावर होणाऱ्या सादरीकरणातून सातत्याने दिसून येते.

हास्यजत्रेतील सिरीजही भन्नाट आहेत. समीरची प्रभाकर मोरेकडून होणारी छळवणूक, ओंकार-चेतनासोबतचे ‘लोचन मजनू’, ‘जावे गप्पांच्या गावा’, कार्यालयातील घडामोडी, प्रसाद-नम्रताची ‘लॉली’, ‘अवली-लवली कोहली’, ‘अगं-अगं आई’, शालू-मालू, सासू सुना आणि मामंजी, शितलीची ‘लव्ह स्टोरी’, पोलीस ठाण्यातील ‘बॉस’ अधिकाऱ्याचे एकतर्फी प्रेमप्रकरण, प्रियदर्शिनी-ओंकारची ‘डेटिंग’, सोसायटीतले ‘फ्लर्टिंग’, ओंकारचे लग्न, खरात काकू, समीर-ईशा किंवा समीर-वनिताचे संसारिक खटके, श्रमेश-प्रथमेश, ग्रामसभा, वेगवेगळ्या विषयांवरचे परिसंवाद…अशा अनेक सिरीजचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ज्या प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.
जमून आलेल्या, प्रासंगिक विनोदांइतकेच फसलेले विनोद आणि विसरलेल्या-चुकलेल्या संवादातून गंमत निर्माण होते. रंगापासून अंगापर्यंत कलाकारांनी स्वत:वर, एकमेकांवर केलेली तसेच सोफ्यांवर बसलेल्यांकडून होणारी शेरेबाजी जास्त गमतीदार वाटते. सादरीकरणानंतर प्रसाद ओकची अभ्यासपूर्ण आणि आटोपशीर टिपणी, सई ताम्हणकरचे दिलखुलास, प्रोत्साहनपर परिक्षण, प्राजक्ता माळी आणि तिच्या अनुपस्थितीत प्रियदर्शिनीचे खुसखुशीत आणि उत्साहपूर्ण निवेदन कार्यक्रमाची रंगत आणखीच वाढवते. आमीर हडकर, बाबा यांची संगीतमंडळी, मेकअप विभाग, आर्ट विभाग, कपडे विभाग असो किंवा हास्यजत्रासाठी दिवसरात्र झटणारा कोणताही घटक असो.. हे सर्व हास्यजत्रेला मिळणाऱ्या उत्तुंग यशाचे समान मानकरी आहेत.
हास्यजत्रेसाठी उत्तमातील उत्तम लेखन करणाऱ्या सर्व लेखकांच्या कल्पनाशक्तीला, विनोदबुध्दीला जितकी दाद द्यावी तितकी कमीच आहे. इतके विविधांगी, गमतीदार विषय त्यांना सुचतात तरी कसे, असा प्रश्न अनेकांना पडतो. नवनवीन कल्पना मांडण्यात सातत्य लेखकांनी दाखवले. विनोदाचा दर्जा कमी न होता तो वाढवत नेण्याची किमया साधली, हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे. प्रत्येक स्किटचं लेखन काटेकोर असतं. विनोद निर्माण करण्यासाठी शब्दखेळ, अचूक टायमिंग, निरीक्षण यांचा सुंदर मिलाफ दिसतो. अनेकदा एखाद्या गंभीर विषयालाही हलक्याफुलक्या पद्धतीने मांडून योग्य परिणाम साधला जातो.
हास्यजत्रेत लोकांच्या जगण्यातलं प्रतिबिंब असते. यात दाखवले जाणारे कित्येक प्रसंग हे आपल्या दैनंदिन आयुष्यातले भाग असतात. त्यामुळे प्रेक्षकांना हास्यजत्रेत स्वतःचं जग दिसतं. एखाद्या उदास, दु:खी, कष्टी असणाऱ्या व्यक्तीने चुकून हास्यजत्रेचे स्किट पाहिले, तर तो त्याचे दु:ख विसरल्याशिवाय राहणार नाही. काही क्षणापूर्वी रडवेला असणारा कधी खळखळून हसू लागेल, त्यालाही कळणार नाही. नियमितपणे हास्यजत्रा पाहणाऱ्यांना त्यातील प्रत्येक कलाकार हा जणू आपल्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखा वाटतो, इतका प्रेक्षकांचा हास्यजत्रेशी घरोबा झाला आहे. पात्र कोणतही असले तरी, ते आपलसं वाटणार असते. म्हणूनच हास्यजत्रा आणि प्रेक्षक यांच्यातील नातं घट्ट होत गेलं. लहानांपासून थोरांपर्यंत सर्व पिढ्यांना एकत्र आणणारी ही मालिका खऱ्या अर्थाने ‘फॅमिली शो’ठरला आहे.
करोनामुळे निर्माण झालेला संकटकाळ किती भयानक होता, याचे नव्याने वर्णन करण्याची गरज नाही. अजूनही त्याच्या भयावह आठवणी सर्वांच्या स्मरणात आहेत. करोनामुळे घराघरात ताणतणाव होता. प्रत्येकाचे जगणं अवघड होऊन बसले होते. कोणालाही घराबाहेर पडता येत नव्हते. काहीच करता येत नव्हते. अशा काळात हास्यजत्रा परिवाराने खऱ्या अर्थाने आधार दिला. अनेक दिव्य पार पाडून तयार केलेले नवे एपिसोड आणि हास्यजत्राचे जुने भाग दिवसभर पाहत राहणाऱ्या लाखो नागरिकांना आपल्या दु:खाचा विसर पडला. करोनाच्या संकटकाळात जगणे सुसह्य आणि सुरक्षितही केले.
त्यानंतरही सातत्याने प्रेक्षकांना मनमुराद आनंद देण्याचे काम हास्यजत्रेने सुरूच ठेवले आहे, याचे ऋण कधीही फेडता येणार नाही, अशी कित्येकांची प्रामाणिक भावना आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम फक्त हसवत नाही, तर डोळ्यात टचकण पाणी देखील आणतो. सर्वधर्मीय, प्रांतीय, जातीपंथियांना जोडण्याचे, एकोप्याचे संदेश देतो. चांगल्या गोष्टींचे समर्थन करतो, वाईटांवर प्रहार करतो. अनेक सामाजिक मुद्दे मांडून त्यावर परखड भाष्य करतो. प्रेक्षकांना गृहीत धरणे, साचेबध्दपणा, कृत्रिम विनोद, ओढून-ताढून केलेला विनोद, सासू-सुनांचे वाद, गृहकलह, तोच-तोचपणा, अशा गोष्टींना कंटाळलेल्या प्रेक्षकांना हास्यजत्राने ताजेपणा दिला. प्रत्येक भागात नवे काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. कटाक्षाने दर्जा टिकवण्याची भूमिका ठेवली. सर्व वयोगटांना भावेल, असा विनोद सादर केला. घरात एकत्र बसून मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहण्याची हरवलेली सवय पुर्नजीवित केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैलीत बोलल्या जाणाऱ्या ठसकेबाज मराठीचा आनंद एकाच कार्यक्रमात मिळू लागला. अशा कारणांमुळेच प्रेक्षकांच्या मनात हास्यजत्रेचे अढळ स्थान निर्माण झाले आहे. हास्यजत्रेच्या प्रक्षेपणाचे वार सातत्याने बदलले, वेळा बदलल्या. मात्र, हास्यजत्रेची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. हास्यजत्रेच्या स्पर्धेत इतर कोणी टिकू शकले नाही.
इतक्या वर्षात तोच-तोच पणा आला आहे, ‘नको त्या’ शब्दांचा वापर टाळा, ‘वसाड्या’ शब्दाचा अतिरेक थांबवा, टकलावरचे आणि जाडीवरचे तेच ते विनोद टाळा, प्राजक्ताचा माईक बंद ठेवत जा, स्किटचा जितका जीव असेल तितकाच त्याचा कालावधी ठेवा, प्रमोशनसाठी आलेले कलाकार स्किटमध्ये घेऊन हास्यजत्रेवर अतिक्रमण होऊ देऊ नका, परिक्षकांकडून कलाकारांना त्याच त्या कॉमेन्टस येणार असतील तर त्या संकलित करा, यासारख्या अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. अनेकदा काही स्किट फसतात, त्यावरही विनोद होतात.
एकूणात काय तर…निखळ मनोरंजनाची ही जत्रा अशीच भरत राहो, त्याचे याच उत्साहात, जल्लोषात आणखी हजारो भाग सादर व्हावेत, अशीच सर्वांची मनोकामना असेल. नव्या जोशात, नव्या संकल्पना राबवत ही जत्रा यापुढेही महाराष्ट्राला खळखळून हसवत राहील, असा विश्वास प्रेक्षकांना नक्कीच असणार आहे.





















Join Our Whatsapp Group