औंध (Pclive7.com):- जनता शिक्षण संस्था संचालित श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, औंध येथील SSC 2002-2003 व HSC बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा रविवार, दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत शाळेच्या प्रांगणात पार पडणार असून, माजी विद्यार्थी, शिक्षकवर्ग व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीकडून करण्यात आले आहे.

या स्नेहमेळाव्याचा मुख्य उद्देश जुन्या आठवणींना उजाळा देणे, शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींना पुन्हा एकत्र आणणे आणि शाळेशी असलेले नाते अधिक दृढ करणे हा आहे. कार्यक्रमात दीपप्रज्वलन, स्वागत समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षकांचा सत्कार तसेच माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यासोबतच, या मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याचा उपक्रम हाती घेतला असून, विविध शैक्षणिक व पायाभूत सुविधा उभारण्याबाबतही चर्चा होणार आहे. आयोजक समितीने अल्पावधीतच मोठ्या संख्येने माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यात यश मिळवले असून, सर्व समित्या समन्वयाने कार्यरत आहेत. त्यामुळे हा मेळावा उत्साहात आणि भव्य स्वरूपात पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

“हा कार्यक्रम केवळ स्नेहमेळावा नसून, जुन्या मैत्रीचा, आठवणींचा आणि शाळेशी असलेल्या भावनिक नात्याचा उत्सव आहे,” असे आयोजकांनी सांगितले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group