पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास रावेत पंपिंग स्टेशन बंद करू; शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा इशारा
पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १६ अंतर्गत किवळे, रावेत व मामुर्डी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत न केल्यास रावेत पंपिंग स्टेशन बंद करू असा इशारा नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी दिला आहे. ऐश्वर्या तरस यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, या भागासाठी सुमारे १८०० क्यूबिक मीटर पाण्याची आवश्यकता असताना सध्या केवळ १६०० ते १६५० क्यूबिक मीटर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन गरजांवर परिणाम होत असून घरगुती वापर, शाळा तसेच इतर आवश्यक कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

तसेच, रावेत येथील पंपिंग स्टेशनमार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचणी असल्याचेही निदर्शनास आले आहे. यावर त्वरित तोडगा काढून प्रभाग १६ मध्ये नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास रावेत येथील शहराला पाणीपुरवठा करणारे पंपिंग स्टेशन बंद करण्याचा इशारा नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर आता ही समस्या सोडवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.



















Join Our Whatsapp Group