चाकण (Pclive7.com):- भारतीय चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या खेळण्यातील बनावट नोटांचा वापर करून कार लंपास करणाऱ्या टोळीचा चाकण पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून कारसह तब्बल ४२ लाख ५० हजार रुपये किमतीच्या खेळण्यातील नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथील हुजेब फिरोज बागवान हे त्यांचे मित्र अरबाज शेख यांची चारचाकी गाडी विक्रीसाठी पुण्यात आले होते. यावेळी आरोपी गणेश ज्ञानदेव ढाकरे याने फोनवरून संपर्क साधत गाडी खरेदी करण्याचा बहाणा केला. ५ एप्रिल २०२६ रोजी चाकणमधील माणिक चौक येथे ३ लाख ५० हजार रुपयांत व्यवहार ठरला. व्यवहारा दरम्यान आरोपीने ५०० रुपयांच्या नोटांचे सहा बंडल प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून दिले आणि उर्वरित ५० हजार रुपये वाहन ट्रान्सफरनंतर देण्याचे सांगितले. पैसे घेतल्यानंतर आरोपी गाडीसह पसार झाला. मात्र, बंडल उघडून पाहिल्यावर वरची आणि खालची नोट खरी असली तरी मधील सर्व नोटा खेळण्यातील असल्याचे समोर आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बागवान यांनी तातडीने चाकण पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास करत गणेश ज्ञानदेव ढाकरे आणि समीर दिनकर महल्ले या दोघांना अटक केली. आरोपींकडून फसवणूक करून नेलेली चारचाकी गाडी, ४२.५ लाख रुपयांच्या खेळण्यातील नोटा, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तसेच नोटांचे बंडल तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, रोख व्यवहार करताना नागरिकांनी नोटांची नीट खात्री करूनच व्यवहार करावा, असे आवाहन चाकण पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



















Join Our Whatsapp Group