पिंपरी (Pclive7.com):- पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत बनावट क्रीडा प्रमाणपत्रे सादर केल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याचा आरोप मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेने केला आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.

संस्थेच्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी ३२२ जागांसाठी आणि ५ फेब्रुवारी २०२६ रोजी १४० वाढीव जागांसाठी भरती जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. या भरती अंतर्गत १५ मार्च २०२६ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली असून सध्या कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. याच टप्प्यात काही उमेदवारांनी ‘कुरास’ (Kuras) या खेळासह इतर क्रीडा प्रकारांची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याची माहिती संस्थेला मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

संस्थाध्यक्ष विकास कुचेकर यांनी सांगितले की, प्रत्यक्षात तालुका, जिल्हा किंवा विभागीय स्तरावर सहभाग नसतानाही काही जणांनी राज्यस्तरीय प्रमाणपत्रे मिळवून भरतीत सादर केली असल्यास हा प्रकार प्रामाणिक उमेदवारांच्या हक्कांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेची पारदर्शकता आणि प्रशासनावरील विश्वास धोक्यात येत आहे.
शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी म्हटले की, पोलीस दलात प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणे हा गंभीर गुन्हा असून प्रत्येक प्रमाणपत्राची संबंधित क्रीडा संघटना व अधिकृत नोंदींच्या आधारे काटेकोर पडताळणी करणे आवश्यक आहे.

प्रमुख मागण्या:
# सर्व क्रीडा प्रमाणपत्रांची सखोल व अधिकृत पडताळणी करावी.
# बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची उमेदवारी तात्काळ रद्द करावी.
# बनावट प्रमाणपत्र तयार करणारे व पुरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
# भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.
संस्थेचे सचिव गजानन धाराशिवकर यांनी सांगितले की, या संदर्भात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, डीसीपी गणेश इंगळे तसेच एसीपी सारंग आव्हाड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. संस्थेने इशारा दिला आहे की, अशा प्रकारांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात बनावट कागदपत्रांचे रॅकेट वाढण्याची शक्यता असून भरती प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



















Join Our Whatsapp Group