पिंपरी (Pclive7.com):- अनधिकृत बांधकामांवरील कारवाईकडे दुर्लक्ष, अतिक्रमण कारवाईची गोपनीय माहिती लोकांना पुरविणे सहायक आयुक्त, कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाला (बीट निरीक्षक) चांगलेच भोवले आहे. सहायक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाला निलंबित केले असून दोघांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

अनधिकृत बांधकामांवरील कारवाईकडे दुर्लक्ष केल्याने ‘ई’ क्षेत्रीय अधिकारी असलेले सहायक आयुक्त तानाजी नरळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण कारवाईसाठी नरळे यांना प्राधिकृत केले आहे. परंतु, त्यांनी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण कारवाईकडे दुर्लक्ष केले. अनधिकृत बांधकामावरील कारवाई संदर्भात फेब्रुवारी २०२६ पासून दर महिन्याला आढावा बैठक घेण्यात येत आहे. ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील ५६२ अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात केवळ ८२ ठिकाणीच अतिक्रमण कारवाई करण्यात आली. ४८० बांधकामांना नोटीस देऊन कोणतीही कारवाई केली नाही. यातून कारवाईबाबतची उदासीनता दिसून येत आहे. अनधिकृत बांधकामावरील कारवाईचे, प्रस्तावित कारवाईचे विवरण सादर करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केले. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचे निरीक्षण नोंदवून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत नरळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शिस्तभंग विषयक कारवाई का करण्यात येऊ नये? याचा लेखी खुलासा तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

कनिष्ठ अभियंता संदीप हजारे यांना निलंबित करून विभागीय चौकशी सुरू केली आहे. हजारे हे स्थापत्य मुख्य कार्यालयात कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवणे, सर्वेक्षण करून अहवाल सादर करणे, अनधिकृत बांधकामांना नोटीस देणे, पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून कारवाई करण्याची जबाबदारी आहे. या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर एक एप्रिल रोजी सर्व साहित्य सामुग्रीसह पोलीस बंदोबस्तमध्ये कारवाईचे नियोजन केले होते. मात्र, कारवाईच्या आदल्या दिवशी ३१ मार्च रोजी हजारे यांनी अतिक्रमण कारवाईची गोपनीय माहिती लोकांना पुरविली. त्यामुळे कारवाईत अडथळा आला. प्रचंड दबाव निर्माण झाला. याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली असता हजारे यांनी कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळे गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका ठेवत हजारे यांना निलंबित केले आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक शेषेराव अटकोरे यांना निलंबित केले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. अटकोरे हे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील प्रभाग क्रमांक २९ पिंपळेगुरव या परिसरातील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, वाढीव बांधकामांचे सर्वेक्षण करून अहवाल देणे, अनधिकृत बांधकामांना नोटीस देणे, पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून कारवाई करण्याची जबाबदारी आहे. असे असताना अटकोरे यांनी अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई केली नाही. सर्वेक्षण केले नाही. अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या नाहीत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांमध्ये मोठी वाढ झाली असून तक्रारीही वाढल्या आहेत. याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली असता कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत अटकोरे यांना निलंबित केले असून विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.



















Join Our Whatsapp Group