पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी (दि.११ डिसेंबर) संविधान सन्मान सोहळा व संविधान प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व निमंत्रक, माजी नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रशांत पगारे हे भुषविणार आहेत.
तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, ॲड. गोरक्ष लोखंडे हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, मनपा विरोधी पक्षनेते दत्ता साने, युवा नेते नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, जगदिश शेट्टी, फझल शेख, अरुण बो-हाडे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, सेवादलाचे अध्यक्ष आनंदा यादव आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर भगवान वैराट यांना ‘झोपडपट्टी रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे आणि यशदाचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या मातोश्री गिरजाबाई पंडीतराव जोगदंड, डॉ. अशोक शिलवंत यांच्या मातोश्री कमल तुळशीराम शिलवंत, पोलिस निरीक्षक कु. सिता वामन वाघमारे, काशीबाई दत्तात्रय गायकवाड आणि माजी समाज कल्याण आयुक्त आर.के. गायकवाड यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनात माजी नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष विनोद कांबळे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग महिला शहराध्यक्षा गंगाताई धेंडे, माजी नगरसेवक व झोपडपट्टी सेल शहराध्यक्ष उत्तम हिरवे यांनी सहभाग घेतला आहे.