पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडमध्ये मोकळ्या जागेत अनधिकृतपणे मातीचा भराव टाकून पवना नदी पात्र आणि नैसर्गिक नाल्याची रुंदी कमी करून पर्यावरणाला हानी पोहोचवल्या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडू दामु चिंचवडे आणि धनंजय खंडू चिंचवडे (दोघेही रा. चिंचवडे लॉन्स जवळ रिवर व्यू हॉटेलच्या समोर चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिका पर्यावरण विभागातील अभियंता पंकज धेंडे यांनी चिंचवड पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२६ ते १० एप्रिल २०२६ या कालावधी दरम्यान चिंचवड येथील सिटी सर्व्हे क्र. २००७ या मोकळ्या जागेत आरोपींनी अनधिकृत माती टाकून भराव केला. या कृत्यामुळे पवना नदी तसेच लगतच्या नैसर्गिक नाल्याच्या पाण्याचा प्रवाह अडथळित झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बळीफ हे करीत आहेत. या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत असून, पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.



















Join Our Whatsapp Group