पिंपरी (Pclive7.com):- सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि लाईक्स-व्ह्यूजच्या हव्यासापोटी तरुणांकडून धोकादायक स्टंट करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. अशाच एका धक्कादायक घटनेत वाकड परिसरात एका २० वर्षीय तरुणाने थार गाडीने भरधाव स्टंटबाजी करत स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घातला.

व्हिडिओ झाला व्हायरल..
सदर तरुणाने वर्दळीच्या रस्त्यावर तसेच फूटपाथवर थार गाडी चालवत रॅश ड्रायव्हिंग केली. हा संपूर्ण प्रकार रील बनवण्यासाठी शूट करण्यात आला होता. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ त्याने स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट केला होता, जो नंतर वेगाने व्हायरल झाला.

पोलिसांची तात्काळ कारवाई..
व्हिडिओ समोर येताच वाकड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित तरुणाचा शोध घेण्यात आला आणि त्याला व त्याच्या मित्राला ताब्यात घेण्यात आले.

हात जोडून मागितली माफी..
पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर तरुणाची ‘रील स्टार’ची हवा उतरली. पोलिसांनी कडक शब्दांत समज दिल्यानंतर त्याने हात जोडून माफी मागितली आणि पुन्हा असे कृत्य न करण्याचे आश्वासन दिले. रील्स आणि लाईक्सच्या नादात कायद्याशी खेळ करू नका, अन्यथा कारवाई अटळ आहे, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.



















Join Our Whatsapp Group