पिंपरी (Pclive7.com):- गोव्यात आयोजित कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन (CPA) वेस्ट झोन–VII च्या प्रतिष्ठित परिषदेत महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य श्री. अमित गोरखे यांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण भाषणातून राष्ट्रीय नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले. ८ ते १० एप्रिल दरम्यान पणजी येथे पार पडलेल्या या तीन दिवसीय परिषदेत त्यांनी ‘विकसित भारत 2047: युवा लोकप्रतिनिधींची भूमिका’ आणि ‘शाश्वत पर्यटनाचा विकासात्मक प्राधान्यक्रम’ या दोन महत्त्वपूर्ण सत्रांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यांतील मोजक्या लोकप्रतिनिधींची या परिषदेसाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये आमदार अमित गोरखे यांची निवड करण्यात आली असून, या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी राज्याचे प्रतिनिधित्व केले.

विकसित भारत 2047: युवा लोकप्रतिनिधींची भूमिका
पहिल्या सत्रात बोलताना आमदार अमित गोरखे यांनी भारताच्या भविष्यनिर्मितीत युवा लोकप्रतिनिधींची भूमिका अधोरेखित केली. ते म्हणाले, “युवा विधायक हे फक्त उद्याचे नेते नसून ते आजचे ‘चेंज एजंट्स’ आहेत. विकसित भारत 2047 चा ध्यास साध्य करण्यासाठी धाडसी, समावेशक आणि नैतिक निर्णय घेण्याची आपली क्षमता अत्यंत महत्त्वाची आहे, ज्यामुळे सर्वसमावेशक विकास सुनिश्चित होईल.”

शाश्वत पर्यटन आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी
दुसऱ्या सत्रात आमदार गोरखे यांनी शाश्वत पर्यटन आणि गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवरील मजबूत कनेक्टिव्हिटीची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, “गोवा केवळ समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जाऊ नये, तर ‘शाश्वत पर्यटन’चा जागतिक आदर्श बनावा. विकास करताना आपल्या नैसर्गिक वारशाचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.”
याच अनुषंगाने त्यांनी पालघरपासून गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत ‘युनिफाइड टुरिस्ट सर्किट’ उभारण्याचा प्रस्ताव मांडला, ज्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील आर्थिक विकासाला चालना मिळेल.

हरित पायाभूत सुविधा आणि डिजिटल गव्हर्नन्सचा आग्रह..
या परिषदेला लोकसभेचे अध्यक्ष श्री. ओम बिर्ला, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभेचे उपसभापती श्री. हरिवंश नारायण सिंह, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि गुजरात विधानसभेचे अध्यक्ष श्री. शंकरभाई चौधरी यांची उपस्थिती लाभली.
या मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार गोरखे यांनी हरित पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून पारदर्शक, जबाबदार आणि नागरिककेंद्रित प्रशासन राबवण्याचा आग्रह धरला.
स्थानिक ते जागतिक संधींचा दुवा
मुंबई-गोवा महामार्ग आणि कोस्टल रोडसारखे प्रकल्प हे केवळ कनेक्टिव्हिटीपुरते मर्यादित नसून स्थानिक उद्योजकांसाठी जागतिक बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याचे प्रवेशद्वार आहेत, असेही त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासनाच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची आपली बांधिलकी त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.
गोवा राज्याचे आभार..
आपल्या भाषणाच्या शेवटी आमदार अमित गोरखे यांनी गोवा सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील उत्कृष्ट आयोजन आणि आदरातिथ्यासाठी मनःपूर्वक आभार मानले. या परिषदेमुळे गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक व आर्थिक संबंध अधिक दृढ होतील आणि झोन VII भारताच्या विकासात महत्त्वाचा घटक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



















Join Our Whatsapp Group