पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील पीसीएमसी कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाजवळ जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि.११) पहाटे पावणेपाचच्या सुमारास घडली.

विवेक ऊर्फ विकी विनोद सोनकांबळे (वय १९, रा. अण्णा भाऊ साठेनगर, निगडी), जुबेर नासीर शेख (वय ३०) या दोघांना अटक केली आहे. श्रवण ऊर्फ सूरज शाहजी कुऱ्हाडे (वय २०, दोघे रा. पीसीएमसी वसाहत, निगडी) आणि त्यांचा एक साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रसाद नंदकुमार बहुले (वय ३०, रा. अण्णा भाऊ साठेनगर, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी प्रसाद आणि आरोपी यांच्यात रात्री सव्वाएकच्या सुमारास वाद झाला होता. याचाच राग मनात धरून आरोपींनी संगनमत केले. पहाटे आरोपींनी प्रसादला गाठून, ‘तुला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केले. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या किरण काळे याच्या हातावरही आरोपी जुबेरने कोयत्याने वार केला. उर्वरित दोन आरोपींनी शौचालयाच्या तुटलेल्या पट्टीने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी परिसरात हत्यारे फिरवून, ‘आम्ही इथले भाई आहोत…’ असा आरडाओरडा करीत दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक दळवी तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group