
औंध (Pclive7.com):- जनता शिक्षण संस्था, पुणे-12 अंतर्गत श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, औंध येथे इयत्ता 10 वी (सन 2002–2003) बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व कृतज्ञता सोहळा रविवारी (दि. 12 एप्रिल 2026) उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाला विद्यमान प्राचार्य रवींद्रनाथ शिवराम नवले, उपप्राचार्य विठ्ठल नारायण चव्हाण, पर्यवेक्षिका स्वाती देशमुख, माजी प्राचार्य जे. बी. जकाते तसेच जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व माजी प्राचार्य नंदकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, शिववंदना, सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. स्वागत गीत, प्रभावी सूत्रसंचालन आणि शिक्षकांचे मार्गदर्शनपर मनोगत यामुळे कार्यक्रमाला विशेष उंची लाभली. तसेच दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून भावपूर्ण स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी संगीता मनाळे, ज्योती गडेराव आणि माधुरी वायदंडे यांनी केले. स्वागत गीत संदीप गुरव, रुक्मिणी सुर्वे आणि ज्योती भोसले यांनी सादर केले. माजी विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये अॅड. अब्दुल ढाले, स्वाती घायाळ आणि नेहा गोळे यांनी मनोगत व्यक्त केले, तर शिक्षकीय मनोगत स्नेहलता जगताप यांनी मांडले. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य नवले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. मल्हारी नागटिळक यांनी केले.

यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पर्यावरणपूरक ‘कुबेर’ (Crassula) रोप देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन विविध समित्यांमार्फत अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या मेळाव्यासाठी चिपळूण, नाशिक, सासवड, बारामती, मुंबई आदी ठिकाणांहून माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित राहिले. सुमारे 120 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, त्यामध्ये 40 ते 50 मुलींचा सहभाग लक्षणीय होता. तब्बल 23 वर्षांनंतर एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी 2002–2003 बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेला सुमारे 50 हजार रुपये किमतीचे लेझर प्रिंटर, स्कॅनर व झेरॉक्स मशीन भेट दिले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. हा स्नेह मेळावा केवळ एक कार्यक्रम न ठरता जुन्या आठवणींना उजाळा देणारा, मैत्रीचे बंध दृढ करणारा आणि कृतज्ञता व्यक्त करणारा अविस्मरणीय सोहळा ठरला आहे.




















Join Our Whatsapp Group