पिंपरी (Pclive7.com):- ताथवडे परिसराचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समावेश होऊन तब्बल १७ वर्षांचा कालावधी उलटूनही येथील जिल्हा परिषद शाळा अद्यापही जिल्हा परिषद प्रशासनाच्या अखत्यारीतच कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी शाळा तात्काळ महानगरपालिकेकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे.

सदर शाळेत सुमारे ४३५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, शाळेत आवश्यक त्या आधुनिक आणि मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. वर्गखोल्यांमध्ये पुरेशा बेंचचा अभाव असल्याने अनेक विद्यार्थ्यांना खाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, नियमित आरोग्य तपासणी, क्रीडा साहित्य, संगणक कक्ष आणि प्रयोगशाळा यांसारख्या अत्यावश्यक सुविधाही अपुऱ्या असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

ताथवडे परिसराचा महानगरपालिकेत समावेश होऊनही इतक्या वर्षांनंतरही परिस्थितीत बदल न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांच्या दृष्टीने हा विषय अत्यंत गंभीर असून तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी राम वाकडकर, नगरसेवक कुणाल वाव्हळकर तसेच नगरसेविका रेश्मा भुजबळ उपस्थित होत्या.
निवेदनात म्हटले आहे की, ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळा तात्काळ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी केली. तसेच शाळा वर्ग झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था, स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सेवा, क्रीडा साहित्य, संगणक कक्ष आणि प्रयोगशाळा यांसारख्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. पर्यायी उपाय म्हणून ताथवडे परिसरात महानगरपालिकेमार्फत नवीन, सुसज्ज आणि सर्व सुविधा युक्त शाळा इमारत उभारण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क, सुरक्षितता आणि शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेता प्रशासनाने या विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही केली जात आहे.




















Join Our Whatsapp Group