पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेवकांमध्ये पक्षशिस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांवर पक्षांतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी दिली.

प्रशांत शितोळे म्हणाले, भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षशिस्तीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. काही नगरसेवकांकडून पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून विचलित होत स्वतंत्र भूमिका घेतली जात असल्याबाबत वरिष्ठ नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे अशा प्रकाराला कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पक्षाची भूमिका एकच असावी, प्रत्येक नगरसेवकाने पक्षाच्या निर्णयानुसारच मतदान आणि भूमिका मांडावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाणे, सभागृहात वेगळी भूमिका घेणे किंवा माध्यमांसमोर पक्षाच्या भूमिकेशी विसंगत वक्तव्य करणे हे पक्षशिस्तीचे उल्लंघन मानले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पक्षशिस्त मोडणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास संबंधितांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार पाठविणे, पदांवरील जबाबदाऱ्या काढून घेणे तसेच पक्षाच्या नियमांनुसार पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला. पक्षात समन्वय, शिस्त आणि एकसंघ भूमिका राखणे अत्यंत आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, नगरसेवकांना सभागृहाचे कामकाज, अधिकार, जबाबदाऱ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांची माहिती देण्यासाठी रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सर्व नगरसेवकांनी अनिवार्यपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी केले.
Tags: Prashant Shitole




















Join Our Whatsapp Group