पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाणपुलाच्या गोलाकार भागात मुसळधार पावसानंतर मोठे भगदाड पडण्यात आले असून, यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उड्डाणपुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

महात्मा बसवेश्वर पुतळा ते अंकुश चौक निगडी ग्रेड सेपरेटर मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरती बंद करण्यात यावी, तसेच पुलाची तांत्रिक तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सचिन काळभोर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे बांधकाम सन २०१८ ते २०२० या कालावधीत सुमारे १४५ कोटी रुपये खर्च करून करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी ठेकेदार कंपनीला १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर सहा महिन्यांची मुदतवाढही देण्यात आली होती. पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यापूर्वीही उड्डाणपुलावर अशाच प्रकारचे भगदाड पडल्याची घटना घडली होती. त्यावेळी संबंधित ठेकेदार कंपनीविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही काळभोर यांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पुलाच्या गोलाकार भागात भगदाड पडल्याचे समोर आले असून, भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आणि आवश्यक असल्यास तो धोकादायक घोषित करण्याचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही सचिन काळभोर यांनी दिला आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group