आळंदी (Pclive7.com):- संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आळंदी येथून पुण्याकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात हजारो वारकरी, दिंड्या, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या वातावरणात माऊलींची पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली.

मुसळधार पावसाची शक्यता आणि इंद्रायणी नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि विविध विभागांनी पालखी सोहळ्यासाठी विशेष नियोजन केले आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसह आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

यंदाच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत असून, माऊलींच्या दर्शनासाठी आणि पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पालखीचा आजचा प्रवास पुण्याकडे होत असून पुढील नियोजित मुक्कामांनंतर हा सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे.

दरम्यान, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आले असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group