पिंपरी (Pclive7.com):- मुखी हरिनामाचा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाला. देहूनगरीतून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या या भक्तिमय सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात भव्य स्वागत करण्यात आले.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा शहरात दाखल होताच भक्ती-शक्ती चौक परिसर वारकरी, भाविक आणि नागरिकांनी फुलून गेला. पालखीच्या स्वागतासाठी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली विशेष स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी आमदार शंकर जगताप, भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखी सोहळ्यात सर्वात पुढे सनई-चौघड्यांचा गजर, त्यामागे तुकोबारायांच्या पालखीचे अश्व आणि फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथातील पादुकांची पालखी असा पारंपरिक व भक्तिमय लवाजमा पाहायला मिळाला. हा अलौकिक सोहळा अनुभवण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भारतीय जनता पक्षाच्या वतीने यावेळी वारकऱ्यांना फळे तसेच बुंदीच्या पुड्यांचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून पुढे दत्तवाडी, विठ्ठलवाडी मार्गे पालखी आकुर्डी गावठाणात पोहोचली. आजचा मुक्काम आकुर्डी येथील दत्तवाडीतील विठ्ठल मंदिरात असणार असून, उद्या सकाळी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. विठ्ठलनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेला हा सोहळा पिंपरी-चिंचवडकरांसाठी अविस्मरणीय ठरला.




















Join Our Whatsapp Group