पिंपरी (Pclive7.com):- मोशी कचरा डेपो परिसरात आज दुपारच्या सुमारास एक गंभीर दुर्घटना घडली. ग्राउंड फ्लोअर प्लस दोन मजली (G+2) आरसीसी संरचनेतील कॅन्टीन व कार्यालयाची इमारत जमिनीखालील पाया खचल्यामुळे अचानक कोसळली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीसीएमसी फायर डिपार्टमेंट, एनडीआरएफ, पीडीआरएफ, घटनास्थळी एकत्रित बचाव कार्य राबवत आहेत.

घटना दुपारच्या जेवणाच्या वेळेत घडल्याने इमारतीमध्ये उपस्थित असलेले अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, सध्या ढिगाऱ्याखाली नेमके किती कर्मचारी अडकले आहेत, याबाबत अधिकृत आणि अचूक माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांचे आवाज ऐकू येत असून ते जिवंत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोध व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून ढिगारा हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे.

दुर्घटनेचे नेमके कारण आणि अडकलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. या घटनेमुळे मोशी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.




















Join Our Whatsapp Group