मांडवी (Pclive7.com):- मांडवी येथे अप्पर तहसील कार्यालय तातडीने मंजूर करण्यात यावे, या मागणीसाठी माजी सरपंच धनलाल पवार यांनी ग्रामस्थांच्या वतीने ५ जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन छेडल्याने आदिलाबाद–सारखणी मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने दखल घेतली. किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार शारदा चोंडेकर यांनी मांडवी येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठविण्यात येईल, असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. या आश्वासनानंतर ७ जुलै रोजी माजी सरपंच धनलाल पवार यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.
यावेळी किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम, नायब तहसीलदार चंद्रशेखर शहारे आणि संध्याताई राठोड यांच्या हस्ते शरबत देऊन धनलाल पवार यांचे उपोषण सोडविण्यात आले.

या प्रसंगी संध्याताई राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रफुल राठोड, नंदाताई पवार, नायक बाबूसिंग राठोड, प्राचार्य नर्सिंग पवार, बंपलवार सर, अविनाश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम, नायब तहसीलदार चंद्रशेखर शहारे, डॉ. विक्रम राठोड, मांडवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड, उत्तम राठोड, तलाठी एस. आर. रेड्डीवार, प्रभावती गुरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश धर्मा राठोड, ग्रामपंचायत सदस्य रेणुका कुडमिते, शेखर हसीना, यशोदाताई आडे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

मांडवी परिसरातील नागरिकांनी अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी एकजूट दाखवत केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाला सकारात्मक भूमिका घ्यावी लागली असून, आता शासनस्तरावर या प्रस्तावाबाबत कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group