पिंपरी (Pclive7.com):- मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा ढिग इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोशी कचरा डेपोमध्ये साचलेल्या कचऱ्याच्या मोठ्या ढिगाऱ्यामुळे शेजारील इमारत कोसळून गंभीर दुर्घटना घडली. या घटनेला महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांच्यासह संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वेस्ट टू एनर्जी प्रकल्प बंद असल्याने कचऱ्याचे ढिग वाढत गेले आहेत. बायोमायनिंगच्या विविध टप्प्यांसाठी शेकडो कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या, मात्र प्रत्यक्षात कचऱ्याचे डोंगर कमी होण्याऐवजी वाढतच गेल्याचा आरोपही त्यांनी केला. पर्यावरण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत या विभागाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी सुलभा उबाळे यांनी केली आहे.

मोशी कचरा डेपोमध्ये राबविण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांवर हजारो कोटी रुपये खर्च झाले असून त्यापैकी अनेक प्रकल्प बंद पडल्याचा दावा करत, सार्वजनिक निधीच्या वापराची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सुलभा उबाळे यांनी पत्राद्वारे केली आहे. मोशी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या मागणीमुळे महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण विभागाच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.




















Join Our Whatsapp Group