पिंपरी (Pclive7.com):- अलीकडील मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत पूरग्रस्त भागांमध्ये तातडीने आरोग्यविषयक सुविधा व स्वच्छता उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.

नाना काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक भागांत घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल, कचरा आणि साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया तसेच इतर साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. पूर ओसरल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खराब झालेले साहित्य व कचरा बाहेर काढला असला तरी कचरा वाहून नेण्यासाठी उपलब्ध यंत्रणा अपुरी पडत असल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

नाना काटे यांनी महानगरपालिकेकडे पूरग्रस्त भागांमध्ये अतिरिक्त कचरा गाड्यांची व्यवस्था करून त्वरित कचरा उचलणे, जंतुनाशक औषधांची फवारणी करणे, ब्लीचिंग पावडरचा वापर करणे, जेट स्प्रे मशीनद्वारे रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणे, डास प्रतिबंधक फॉगिंग मोहीम राबविणे तसेच आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय पथके तैनात करून नागरिकांना तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

पूरग्रस्त नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून महानगरपालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नाना काटे यांनी व्यक्त केली आहे.




















Join Our Whatsapp Group