पिंपरी (Pclive7.com):- सांगवी व दापोडी परिसरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या अडचणींची पिंपरी चिंचवड महापालिकेने तातडीने दखल घेतली असून, पाणीपुरवठा अधिक नियमित, वेळापत्रकानुसार आणि सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक निर्देश देण्यात आले असून, पाणीपुरवठा व्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगवी व दापोडी परिसरातील जलवाहिन्या, उंच जलकुंभ आणि वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. पाण्याच्या टाक्यांवर नियमित कर्मचारी उपलब्ध राहतील, वितरणाचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाईल तसेच नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांत काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वितरण व्यवस्थेचे तांत्रिक परीक्षण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आवश्यक असेल तेथे मनुष्यबळ वाढविणे, देखरेख मजबूत करणे आणि पाणीपुरवठा नियंत्रण प्रणाली अधिक सक्षम करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
याशिवाय पाण्याच्या गुणवत्तेवरही विशेष भर देण्यात आला असून, नियमित नमुना तपासणी, जलकुंभांची स्वच्छता आणि वितरण यंत्रणेवर सतत देखरेख ठेवली जात आहे. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश बरीदे यांनी सांगितले की, “सांगवी व दापोडी परिसरातील पाणीपुरवठ्याबाबत प्राप्त झालेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून नियमित आणि वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल.”

महापालिकेने नागरिकांनाही पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण असल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालय अथवा पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सांगवी व दापोडी परिसरातील पाणीपुरवठा अधिक नियमित, पारदर्शक आणि वेळापत्रकानुसार करण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून जलकुंभ, जलवाहिन्या आणि पाणीपुरवठा प्रक्रियेवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.– अजय सूर्यवंशी, सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका





















Join Our Whatsapp Group