पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी- चिंचवड पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या दोघींनी पिंपरी चिंचवडमध्ये येऊन परीक्षा दिली. पास झाल्यानंतर तीन वर्षांपूर्वी दोघींची पोलिस शिपाई पदावर एकाच पोलिस ठाण्यात नियुक्ती देखील झाली. त्यानंतर सोबत राहणाऱ्या त्या दोघींनी आता थेट समलैंगिक विवाहासाठी सुट्टीचा अर्ज दिला असून, येत्या रविवारी (३० ऑगस्ट) आळंदी येथे वैदिक पद्धतीने त्या विवाहबद्ध होणार आहेत.

सामाजिक चौकट मोडून त्या दोघींनी घेतलेल्या या निर्णयावर एकूणच पोलिस दलात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. महत्वाचं म्हणजे यातील एका महिला पोलिसाच्या कुटुंबियांचा या विवाहास विरोध असल्याचे सांगितले जाते. तर दुसऱ्या महिला पोलिसाने लिंग बदल उपचार घेण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी ती दोन ते तीन वेळा मुंबई येथील प्रतिथयश हॉस्पिटलमध्ये जाऊन आली आहे.
नव्याने राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेद्वारे त्या दोघी पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पिंपरी चिंचवडमध्ये आल्या होत्या. याबाबत समजलेल्या माहितीनुसार, त्या दोघींपैकी एक उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातील रहिवासी तर दुसरी पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील गावात राहणारी आहे.

तर दुसरीकडे या दोघींमधील असलेली जवळीक वाढत गेली आणि याची कुणकुण एकीच्या घरच्यांच्या लक्षात आली. पुणे जिल्ह्याच्या सीमेवर घर असणारे तिचे कुटुंबीय याबाबत जाब विचारण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यात देखील येऊन गेल्याचे अन्य पोलिस कर्मचारी आता सांगतात. तेव्हा संबंधित पोलिस ठाण्यात दोघींच्या लव्ह लाइफ बाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, हा वैयक्तीय विषय असल्याने त्यावर इतरांनी बोलणे टाळावे असे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना समजावले होते. त्यामुळे या चर्चा थांबल्या होत्या.
बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर आता त्या दोघींनी आपले समलैंगिक संबंध एकप्रकारे जाहीर करत विवाहासाठी सुट्टीचा अर्ज पोलिस ठाण्यात सादर केला आहे. विशेष म्हणजे या दोघींनी सुट्टीच्या अर्जासोबत लग्न पत्रिका देखील जोडली असून, कायद्याने अशा लग्नास मान्यता नसली तरी समलैंगिक संबंधाला कायदेशीर बंधने नसल्याने त्या येत्या रविवारी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.




















Join Our Whatsapp Group