शहरातील पक्ष बांधणी, बुथ कमिटी, नगरसेवकांची कोणती विकास कामे प्रलंबित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांची कामे होत आहेत का? याचा बैठकीत अजित पवार यांनी आढावा घेतला. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत आहे का?, मेट्रोचे काम, विविध विकास कामांचा आढावा घेतला. महापालिकेत होणाऱ्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवार आक्रमकपणे आवाज उठवा. जादा दराच्या निविदा स्वीकारल्या जात आहेत. त्याला प्रखर विरोध करा. चुकीची कामे जनतेपर्यंत पोहचवा अशा सूचना पवार नगरसेवकांना दिल्या. तसेच लोकसभा, विधानसभा निवडणूक जवळ आली असून वेळ कमी आहे. त्यानुसार कामाला लागा, असेही त्यांनी बजावले.
मावळ लोकसभेचा उमेदवार योग्य वेळी जाहीर केला जाईल. शरद पवार साहेब उमेदवार ठरविणार आहेत. त्यामुळे उमेदवार कोण असेल याचा विचार करत न बसता कामाला सुरुवात करावी. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक पातळीच्या निवडणुका वेगळ्या असतात. राष्ट्रवादीची सत्ता असताना केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. आपआपसातील मतभेद बाजूला ठेऊन प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कामाला सुरुवात करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, मावळच्या आखाड्यात उतरण्यासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी कंबर कसली आहे. संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढायला सुरूवात देखील केली आहे. तर दुसरीकडे अजित पवारांचे पुत्र पार्थ यांची देखील मावळच्या रिंगणात एंन्ट्री झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील राष्ट्रवादीच्या फलकांवर पार्थ यांचे ब्रँन्डींग होत आहे. पार्थ लोकसभा लढणार असल्याच्या चर्चेने विरोधकांचे ढाबे देखील दणाणले अाहेत. आता शरद पवार साहेबच उमेदवार जाहिर करतील असे सांगत अजित पवारांनी ‘सस्पेंन्स’ कायम ठेवला आहे.






















Join Our Whatsapp Group