पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, उंच इमारती आणि गृहसंकुलांची संख्या लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्या आहेत.

ड प्रभागांतर्गत विकसित होणाऱ्या नवीन अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक जागा तातडीने हस्तांतरित करून केंद्राच्या उभारणीच्या कामाला गती द्यावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. नवीन अग्निशमन केंद्र कार्यान्वित झाल्यास परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत अधिक जलद आणि प्रभावी सेवा मिळू शकेल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तसेच ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सध्या कार्यरत असलेल्या अग्निशमन केंद्रावर उपलब्ध वाहनांची संख्या अपुरी असल्याचे सांगत, अतिरिक्त अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. एखादे वाहन अन्य ठिकाणी कार्यरत असल्यास संबंधित भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अडचणी येऊ शकतात, त्यामुळे आवश्यक संख्येने वाहने कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावीत, असे काटे यांनी म्हटले आहे.

याशिवाय अग्निशमन अधिकारी, जवान आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून मनुष्यबळ बळकट करावे, जेणेकरून उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून आपत्कालीन घटनांवर तातडीने प्रतिसाद देता येईल, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात नवीन अग्निशमन केंद्रासाठी जागा हस्तांतरित करणे, प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून कामाला गती देणे, निर्धारित कालावधीत केंद्र पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत दाखल करणे, विद्यमान केंद्रावर वाहनांची संख्या वाढविणे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेशी हा विषय थेट संबंधित असल्याने महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group