पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाच्या तपासाला गती देत वाकड पोलिसांनी घटनास्थळी रिक्रिएशन (घटनाक्रमाची पुनर्रचना) केले. या प्रकरणात अटकेत असलेले शिल्पा गवारे यांचे पती सचिन गवारे, सासू संजीवनी गवारे, सासरे उत्तम गवारे आणि दीर यांच्याकडून आत्महत्येच्या दिवशी तसेच त्यापूर्वी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती घेण्यात आली.

शिल्पा गवारे यांनी सासरच्या घरी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याचे समोर आले होते. मात्र, त्यावेळी बेडरूमचे दार उघडे असल्याचा मुद्दा उपस्थित करत शिल्पा यांच्या माहेरच्या कलाटे कुटुंबीयांनी हा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

तपासाचा भाग म्हणून आज पोलिसांनी आरोपींकडून त्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेत घटनास्थळी प्रत्यक्ष रिक्रिएशन केले. आत्महत्येपूर्वी घरात नेमक्या कोणत्या घटना घडल्या, कोण कुठे उपस्थित होते आणि परिस्थिती कशी निर्माण झाली, याबाबत आरोपींकडून माहिती घेण्यात आली.

या रिक्रिएशनदरम्यान वैद्यकीय तज्ज्ञांचे पथकही पोलिसांसोबत उपस्थित होते. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि आरोपींच्या जबाबांची पडताळणी करण्याच्या दृष्टीने हे रिक्रिएशन महत्त्वाचे मानले जात आहे. या प्रक्रियेतून तपासासाठी उपयुक्त माहिती समोर येण्याची शक्यता असून शिल्पा गवारे यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती, याचा सखोल तपास वाकड पोलीस करत आहेत.


















Join Our Whatsapp Group