
पिंपरी (Pclive7.com):- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा धारदार शस्त्राने वार करून आणि चेहरा विद्रुप करून खून केल्याच्या आरोपाखाली पतीसह चार जणांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील मंत्रा मोमेंट्स सोसायटीच्या कमर्शियल ऑफिससमोर ही घटना घडली होती. पोलिसांनी गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावला.

१२ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री एका ३० वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. धारदार शस्त्राने वार करून तसेच चेहरा विद्रुप करून महिलेची हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला महिलेची ओळख पटली नव्हती.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मृत महिलेची ओळख प्रियंका आकाश कांबळे अशी पटवली.

चारित्र्याच्या संशयातून कट रचल्याचा आरोप
पोलिसांच्या तपासानुसार, प्रियंका हिच्या चारित्र्यावर संशय असल्याने तिचा पती आकाश ऊर्फ घाऱ्या रमेश कांबळे याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात प्रथम कांबळे, रोहित शिंदे आणि दिनेश वाघमारे या तिघांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

गुन्ह्यानंतर पळून गेलेल्या चारही आरोपींचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना २४ तासांच्या आत अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत असून, खुनामागील नेमकी कारणे आणि गुन्ह्यातील इतर बाबींचा तपास सुरू आहे.



















Join Our Whatsapp Group