
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांसह संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया संघटनेची मागणी
पुणे (Pclive7.com):- पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) मध्ये पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना काढण्यात आलेल्या प्रशासकीय आदेशांबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया संघटनेने निवडणूक यंत्रणेकडे केली आहे.

या संदर्भात पार्टी ऑफ इंडिया संघटनेने महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अनिल कांबळे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सागर कांबळे पिंपरी चिंचवड शहर युवा अध्यक्ष तेजस चंदनशिवे यांनी पुणे विभागीय आयुक्त तथा पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन देत तक्रार केली आहे. त्यांच्यासह भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार सादर करण्यात आली आहे. तसेच देशातील व राज्यातील संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यंत्रणेकडेही निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील अधिसूचना दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर झाल्यानंतर PMPML मध्ये दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी कार्यालयीन आदेश क्रमांक १६७६ आणि दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी कार्यालयीन आदेश क्रमांक १७३२ काढण्यात आले. या आदेशांमधील प्रशासकीय बदल्या, अधिकारांचे फेरवाटप आणि अतिरिक्त कार्यभार सोपविण्याच्या निर्णयांची आचारसंहितेच्या अनुषंगाने तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कार्यालयीन आदेश क्रमांक १६७६ नुसार, सहव्यवस्थापकीय संचालक श्रीमती एलिस पोरे यांच्याकडील प्रशासकीय अधिकार काढून ते अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्याकडे सोपविण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत असा निर्णय घेण्याची आवश्यकता काय होती, तसेच या निर्णयामागील प्रशासकीय कारणे कोणती होती, याची चौकशी करण्यात यावी. तसेच, कार्यालयीन आदेश क्रमांक १७३२ दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ नुसार, स्टोअर्स अँड परचेस विभागातील अधिकारी निवृत्ती परशुराम भांडे यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करून त्यांच्याशी संबंधित काही जबाबदाऱ्या व अतिरिक्त कार्यभाराचे फेरवाटप करण्यात आल्याचा मुद्दा तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. तसेच गोविंद बाळकृष्ण हांडे यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या अतिरिक्त कार्यभाराची आवश्यकता, संबंधित पदांचा अनुभव आणि या निर्णयामागील प्रशासकीय निकष तपासण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

याच आदेशाद्वारे झोनल मॅनेजर राजेश भानुदास जाधव आणि मोहन केदारी दडस यांच्या रजा मंजुरीसंबंधी अधिकारांमध्ये वाढ करण्यात आल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे. यापूर्वी हे अधिकार डेपो व्यवस्थापकांकडे असताना त्यांचे फेरवाटप करण्याची आवश्यकता काय होती, याचीही चौकशी व्हावी, असे कांबळे यांनी म्हटले आहे. डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत महानगरपालिका निवडणुकांच्या आचारसंहितेदरम्यान PMPML मध्ये लिपिक भरती आणि पदोन्नतीसंदर्भातील आदेश काढण्यात आल्याचा आरोपही नाईक यांनी केला आहे. या पूर्वीच्या निर्णयांची नोंद तपासून त्यावेळी लागू असलेल्या नियमांचे पालन झाले होते का, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

PMPML ही सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी महत्त्वाची संस्था असून तिच्या कामकाजात पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि प्रशासकीय उत्तरदायित्व राखणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित आदेशांची कागदपत्रांसह तपासणी करून कोणताही गैरप्रकार किंवा नियमभंग झाला आहे का, हे स्पष्ट करण्यात यावे, असे कांबळे यांनी नमूद केले.

या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करावी, आचारसंहितेचा भंग झाल्याने संबंधित जबाबदार व्यक्तींवर लागू कायद्यानुसार फौजदारी कारवाई करावी आणि त्वरित गुन्हा दाखल करावी तसेच बेकायदेशीर केलेले बदली आदेश रद्द करावी अशी मागणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया संघटनेने केली आहे. या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा तसेच न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे.


















Join Our Whatsapp Group