
सखोल चौकशी करण्याची नगरसेविका प्रियांका कुदळे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधील कमला नेहरू प्राथमिक शाळा, मुले-मुली क्र. ४/२ येथे मुख्याध्यापकांसह शिक्षकांची अनुपस्थिती आणि अपुऱ्या शिक्षकबळामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. नगरसेविका प्रियांका सुनील कुदळे यांनी सोमवार, दि.१२ ऑक्टोबर रोजी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान या बाबी निदर्शनास आल्याचे सांगत महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे सखोल चौकशी करून लेखी अहवाल देण्याची मागणी केली आहे.

शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न..
शाळेच्या पाहणीवेळी मुख्याध्यापक आणि शिक्षक अनुपस्थित असल्याचे आढळल्याचा दावा प्रियांका कुदळे यांनी केला आहे. शिक्षकांच्या अनुपस्थितीत विद्यार्थ्यांची देखरेख कोण करणार, तसेच एखादी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा अनुचित घटना घडल्यास जबाबदारी कोणाची राहणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधितांच्या अनुपस्थितीची कारणे आणि उपस्थिती नोंदींची तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

३५ विद्यार्थ्यांसाठी अपुरी अध्यापन व्यवस्था..
सदर शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकूण ३५ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पाहणीदरम्यान इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी एका वर्गात, तर पाचवी ते सातवीचे विद्यार्थी दुसऱ्या वर्गात बसविण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचे कुदळे यांनी म्हटले आहे. एकाच शिक्षकावर पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी असल्यास प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम पूर्ण करणे, विद्यार्थ्यांच्या अध्ययनस्तरानुसार मार्गदर्शन करणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे कठीण ठरू शकते. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

विद्यानिकेतन शाळेत समायोजनाची मागणी..
या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी तातडीने चौकशी करून १२ ऑक्टोबर रोजी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या उपस्थितीबाबतचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शाळेत नियमित शिक्षकांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक देखरेख सुनिश्चित करावी, अपुऱ्या शिक्षकबळावर उपाययोजना कराव्यात आणि इयत्तानिहाय प्रभावी अध्यापनाची व्यवस्था करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय, शक्य असल्यास कमला नेहरू प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे पिंपरी-वाघेरे येथील विद्यानिकेतन शाळेत समायोजन करण्याच्या प्रस्तावाचा प्राधान्याने विचार करून आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी प्रियांका कुदळे यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि त्यांना सुरक्षित वातावरणात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी करून केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी नगरसेविका प्रियांका कुदळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

















Join Our Whatsapp Group