पिंपरी (Pclive7.com):- शिरूर लोकसभा मतदार संघाच्या आखाड्यात उतरण्यास तीव्र इच्छूक असलेले जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी आज भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावर दोघांनीही भाष्य करणे टाळले असले तरी आगामी निवडणूकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण खलबते झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेना वगळता इतर पक्षात कोण उमेदवार आहे हे सांगणे कठीण आहे. पण युती झाली नाही तर भाजपकडून आमदार महेश लांडगे यांचे नाव चर्चेत आहे तर राष्ट्रवादीकडून विलास लांडे यांच्या नावाची चर्चा आहे. शिरूर मतदार संघाच्या आखाड्यात उतरण्यास मंगलदास बांदल हे ही प्रयत्नशील आहेत. पक्ष कोणताही असो लोकसभा निवडणुकीत उभे रहायचेच असा चंग त्यांनी बांधला आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महेश लांडगे आणि मंगलदास बांदल यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही नेत्यांनी या भेटीबाबत मौन बाळगले असले तरी या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे अंदाज राजकीय पंडित व्यक्त करत आहेत.
परिस्तिथी निर्माणच झाली तर एकमेकांना मदत करण्याची तयारी दोघांनी दाखवली असल्याचेही ‘दबक्या’ आवाजात बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीचा पट सजला असताना या दोन संभाव्य उमेदवारांची भेट राजकीय नाही यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. दोघे या बाबतीत काही बोलत नसले तरी दोघांनी कुणाची ‘गेम’ करायची याची रणनिती तर आखली नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय..!