पिंपरी (Pclive7.com):- शास्तीकराच्या प्रश्नाबाबतचा प्रस्ताव येत्या पंधरवड्यात मंत्रिमंडळापुढे मांडला जाणार आहे. पवना जलवाहिनीसोबत मावळातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र जलवाहिनी करण्याबाबत सोमवारी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंग परदेशी यांच्यासोबत चर्चा झाली असल्याची माहिती भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.
राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पालिकेतील विविध विभागांचे प्रमुख यांची व्हिडीओ कॉन्फ्रन्सव्दारे प्रविणसिंग परदेशी आणि सरकारच्या विविध विभागांचे सचिव यांच्यासोबत चर्चा झाली. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार हे देखील या बैठकीला महापालिका भवनात उपस्थित होते.
महेश लांडगे म्हणाले की, शास्तीकर ठरविण्याचे अधिकार महापालिकेला देण्यात यावेत, असे आम्ही सुचवले. त्यासंदर्भात प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल. तो मंजूर झाल्यानंतर महापालिकेकडे शास्तीकराची रक्कम ठरविण्याचे अधिकार येतील. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सिंचनासाठी व त्यांच्या गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यासाठी दिडशे कोटी खर्च अपेक्षित असून, महापालिकेकडून तो खर्च करण्यात येणार आहे.





















Join Our Whatsapp Group