पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण शास्तीकर माफी, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोड अशा अनेक प्रश्नांसंदर्भात सत्ताधारी भाजपा विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे तसेच विविध सामाजिक संस्थाच्यावतीने मानवी साखळीव्दारे पिंपरी चिंचवड मुख्यालयास सोमवारी (दि.११) रोजी दुपारी ३ वाजता घेराव घालणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख योगेश बाबर, मनसे गटनेते सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी व म्हाडा क्षेत्रातील वर्षानुवर्षे भिजत पडलेल्या संपूर्ण शास्तीकर माफी, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोड असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांकडे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी सर्व पक्षीय व सामाजिक संस्थाच्यावतीने हातात गाजर घेऊन मानवी साखळीव्दारे महापालिका मुख्यालयास सोमवार दिनांक ११ रोजी दुपारी ३ वाजता घेराव घालण्यात येणार आहे. या घेराव आंदोलनामध्ये शहरातील सामाजिक संस्था सर्व विरोधी राजकीय पक्ष व नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.





















Join Our Whatsapp Group