पिंपरी (Pclive7.com):- जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवक दिनापासून पिंपरी चिंचवड शहरात युवक काँग्रेसच्या वार्ड चलो अभियानाव्दारे वाड्या-वस्त्यांवर जाऊन, बेरोजगार युवक युवती व जनसामान्यांशी संवाद साधून, पक्षाचा आगामी संकल्प लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आणि काँग्रेसची ध्येय धोरणे सांगून त्यांना काँग्रेस पक्षाशी जोडण्याचे काम शहर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते करीत आहेत. अशी माहिती युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी बुधवारी पिंपरीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी करण गिल, हिराचंद जाधव, कल्याणी माणगावे, संदेश बोर्डे, नासिर चौधरी, वसीम इनामदार आदींसह युवक काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
वार्ड चलो अभियानात कोपरा सभा, ठिकठिकाणी बैठकांमध्ये ‘युवा शक्ती कार्ड व किसान शक्ती कार्ड’ नोंदणी करुन घेण्यात येत आहे. तसेच केंद्रात व राज्यात असणाऱ्या भाजपा सरकारची निष्क्रीयता, नाकर्तेपणा, अन्याय व भ्रष्टाचार लोकांसमोर आणण्याचे काम युवक काँग्रेस करीत आहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून युवा शक्ती कार्डसाठी एका महिन्यात साडेतीन हजारांहून जास्त बेरोजगार युवक युवतींनी नोंदणी केली आहे. आगामी काळात दहा हजार युवकांच्या नोंदणीचे उद्दीष्ट आहे. शहरी भागात युवा शक्ती कार्डव्दारे युवक युवतींना काँग्रेसचे सरकार आल्यावर मासिक बेराजगार भत्ता देण्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे. तसेच युवक काँग्रेसच्या माध्यमातून स्वंयरोजगार कार्यालयांचे सक्षमीकरण, वसतीगृहांची निर्मिती, कमी व्याज दराने शैक्षणिक कर्ज व बीनव्याजी व्यावसायिक कर्ज असा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे. तसेच ग्रामीण भागांत किसान शक्ती कार्डव्दारे कोरडवाहू जमीन शेतकरी व अल्प भूधारकांना पुर्ण कर्ज माफी, शेतीमालाला हमीभाव, अवजारे खरेदीसाठी सहाय्य, आवश्यक तेथे शीतग्रहांची निर्मिती व हवामान अंदाजासाठी वेधशाळांचे आधुनिकीकरण प्रकल्पांसाठी नोंदणी करून घेतली जात आहे त्याला देखील ग्रामिण भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मोदी सरकारने देशातील जनतेला विश्वासात न घेता हुकूमशाही पध्दतीने एक रात्रीत नोटाबंदी लादली. त्यामुळे कोट्यांवधी जनतेला रोजगार बुडाला, देशभर आर्थिक मंदीचे सावट आहे. दोन वर्ष होऊन गेली तरी परिस्थितीत बदल झाला नाही. बेरोजगारीत पिचलेल्या युवकांना मदत करण्या ऐवजी हे सरकार ‘पकोडे’ तळण्याचा सल्ला देते. शेतकऱ्यांना पुर्ण कर्ज माफी देण्याचे आश्वासन पाच वर्षांत पुर्ण करता आले नाही. वाढलेल्या महागाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर सहा टक्क्यांहून जास्त असल्याचा केंद्र सरकारचा अहवाल सांगतो. हि आकडेवारी मागील पंच्चेचाळीस वर्षांतील उच्चांक आहे. शहरी भागात तर बेरोजगारीचा दर 7.8 टक्के आहे. सुशिक्षित महिला बेरोजगारीचा दर 17.3 टक्के झाला आहे. शहरात महिला बेरोजगारीचा दर 27.2 टक्के इतका वाढला आहे. हा नोटाबंदी व जीएसटीचा परिणाम आहे. अशी माहिती नरेंद्र बनसोडे यांनी दिली.
12 जानेवारी जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवक दिनापासून सुरू झालेले अभियान मोरवाडी, कुदळवाडी चिखली, संत तुकाराम नगर, पिंपरी गांव, पिंपरी मंडई, भीमनगर, अजंठानगर दत्तनगर या भागात व एकूण 30 ठिकाणी यशस्वीरित्या राबवण्यात आले. शहरात सर्वत्र युवा शक्ती कार्ड नोंदणीस बेरोजगारांचा मोठा प्रतिसाद आहे. शहरात काँग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे व या अभियानांव्दारे जनसंपर्कातून – जनसहभाग वाढत दिसते. अशी माहिती युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिली.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा थेट जनतेच्याच दरबारात पंचनामा करण्यासाठी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते काम करीत आहेत. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यानंतर युवक, शेतकरी आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणती धोरणे राबविणार आहे याची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसतर्फे राज्यभर ‘चलो पंचायत अभियान’ राबविले जात आहे. युवक, शेतकरी, महिला यांच्यासाठी काँग्रेस पक्षाचे धोरण नेमके काय असणार याबद्दल माहिती दिली जात आहे. ‘चलो पंचायत अभियान’ हा गावं आणि शहरांना थेट काँग्रेस पक्षासोबत जोडणारा उपक्रम आहे. त्यासोबतच महाराष्ट्राच्या मनात भाजप व सेनेबद्दलचा जो रोष आहे, ते समजून घेण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जनसंपर्क करत आहेत. महाराष्ट्रातील 200 हुन अधिक विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम सुरु झाला आहे. आजवर महाराष्ट्रात 50 लाख जनतेपर्यंत युवक काँग्रेस पोहोचली आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 5300 सक्रीय युवक काँग्रेस समन्वयक कार्यरत आहेत.
गडचिरोली, मेळघाट या परिसरातील दुर्गम भागातही हे अभियान अत्यंत उत्साहाने राबविले जात आहे, याखेरीज नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर या सारख्या मोठ्या शहरांमध्ये या अभियानाला मिळणारा प्रतिसाद म्हणजे जनतेच्या मनातील सरकारच्या विरोधात असणाऱ्या संतापाचे प्रतिक आहे.
चलो पंचायत अभियानाच्या माध्यमातून युवक काँग्रेस पाच कलमी कार्यक्रम राबवीत आहे, यात युवकांसोबत संवाद साधून मोदी आणि फडणवीस सरकारकडून झालेली फसवणूक, फसलेल्या आर्थिक नीती आणि 2 कोटी रोजगाराचे खोटे आश्वासन या बाबी युवकांच्या निदर्शनास आणून दिल्या जात आहे आणि काँग्रेसचे सरकार आल्यावर युवकांसाठी पक्षाने काय भूमिका घेणार आहे, हे समजून सांगितले जात आहे, त्यामुळे बेरोजगार युवकांकडून युवाशक्ती कार्ड भरुन घेण्यास प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी बांधवाना धीर देत त्यांच्याकडून किसान कार्ड भरुन घेतले जात आहे. कर्नाटक, पंजाब, छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्यप्रदेशात काँग्रेसने घेतलेली भूमिका महाराष्ट्रातही राबविणार असल्याची हमी यावेळी शेतकऱ्यांना काँग्रेस देत आहे. याशिवाय भाजपच्या खोट्या आश्वासनांची माहिती जनतेला दिली जात आहे. तसेच स्थानिक समस्यांचा आढावा घेतला जातो. आवश्यक तेथे युवक काँग्रेसची शाखा सुरु करण्यात येत आहे. महाराष्ट्रात या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातून 5 कोटी जनता, 25 हजार गावे, 20 महानगरे आणि 500 छोट्या शहरात युवक काँग्रेस पोहोचणार आहे. अशीही माहिती नरेंद्र बनसोडे यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group