पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या ५ वर्षात सामान्य जनतेशी समरस होऊन खासदार श्रीरंग बारणे यांनी काम केले आहे. त्यांच्यावर टिका करून महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्ट कारभारापासून शहरातील नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचा ‘उद्योग’ पक्षनेत्यांकडून सुरू आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांना निवडून येता आले नाही. एकनाथ पवार यांनी स्वत:ची पात्रता ओळखून टिका करावी असा टोला शिवसेना नगरसेवक सचिन भोसले यांनी लगावला आहे.
मावळ लोकसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे. महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते यांनी काल खासदार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात पत्रक काढून आरोप केले होते. पवारांनी केलेल्या आरोपांचा आज शिवसेना नगरसेवक सचिन भोसले यांना चांगला समाचार घेतला आहे.
सचिन भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पात्रतेपेक्षा मोठे पद महापालिकेत मिळाल्याने एकनाथ पवार सुर्यावर थुंकण्याचा प्रकार करित आहेत. खासदार श्रीरंग बारणे हे सर्वसामान्य जनतेसाठी काम करतात, लोकांमध्ये मिसळून राहणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद केलेल्या श्रीरंग बारणे यांची स्वत: लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी स्तुती केली आहे. महाजन या भाजपच्या ७ वेळा खासदार राहिल्या आहेत. खासदार बारणे यांनी सलग पाच वर्षे संसदरत्न पुरस्कार पटकावून इतिहास रचल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची माती सरकू लागली आहे.
एकनाथ पवार हे डोळ्यावर पट्टी बांधून काम करत आहेत. महापालिकेत चाललेला भ्रष्ट कारभार, जनतेच्या पैशाची सुरू असलेली लूट त्यांना दिसत नाही. त्यांना स्वप्नातही खासदार बारणेच दिसू लागले आहेत. पालिकेतील त्यांच्या भ्रष्ट कारभारापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी खासदार बारणेंवर आरोप केले जात आहेत. एकनाथ पवार यांना मोदी लाटेतही निवडून येता आले नाही. त्यांनी स्वत:ची पात्रता ओळखून घ्यावी असा टोला सचिन भोसले यांनी एकनाथ पवारांना लगावला आहे.