पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य पैलवान ग्रुपच्या वतीने कोल्हापूर येथे भरवण्यात आलेल्या चितपट कुस्ती स्पर्धेत पिंपरी चिंचवड मधील थेरगावच्या वैभव बारणे याने बाजी मारत हनुमंत केसरी किताब पटकवला. त्याने वारणेचा विकास पाटीलला आस्मान दाखवत चितपट केले.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती शाहू खासबाग मैदानात जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे अध्यक्ष महेश जाधव, पैलवान ग्रुपचे अध्यक्ष मारुती जाधव उपस्थित होते. परिसरातील अनेक मल्लांनी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
मैदानातील प्रमुख आकर्षण असणाऱ्या कुस्त्यांमधे 2018 चा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख व डबल हिंद केसरी सोनू यादव यांच्यात झालेल्या लढतीत बाला रफिक शेख याने तर महान भारत केसरी माऊली जमदाडे व भारत केसरी पवन दलाल यांच्या लढतीत माऊली जमदाडे याने विजय मिळवला. शंभराहून अधिक नामवंत मल्लांनी कुस्ती स्पर्धेत हजेरी लावत कुस्त्या केल्या.
हनुमंत केसरी किताबाचा मानकरी ठरलेला वैभव बारणे हा मुळचा थेरगावचा असून आपले वडील थेरगावचे पोलीस पाटील नामवंत मल्ल दिलीप बारणे यांच्या कडून लहानपणीच कुस्तीचे बाळकडू घेतले. सध्या तो कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत वस्ताद मारूती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करत आहे.






















Join Our Whatsapp Group