पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील आस्थापनेवरील सरळसेवेची रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. याबाबत वाघेरे यांनी महापौर राहुल जाधव यांच्या उपस्थितीत आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक सागर गवळी, मोरेश्वर भोंडवे यांंच्या उपस्थित होते.
संदीप वाघेरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी महापालिकेची लोकसंख्या जवळपास २२ लाखापेक्षा अधिक झाली असून महापालिकेचे क्षेत्रफळ १८१ चौ.कि.मी. इतके आहे. अशा वाढत्या लोकसंख्येसाठी अत्यावश्यक सेवा व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांची संख्या ८ झाली आहे. सदर नवीन क्षेत्रीय कार्यालायाकरिता नव्याने कर्मचारी भरती न करता सध्या उपलब्ध असलेल्या कर्मचारी वर्गातूनच काम करून घेण्यात येत आहे. त्यामुळे उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला असून वर्ग १ व २ च्या अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील विविध विकास कामांसाठी आरक्षित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच रस्ता रुंदीकरणाद्वारे बाधित होणाऱ्या ज्या भूखंडधारकाचे ५०० चौ.मीटर पासूनचे पुढील क्षेत्र पिंपरी चिंचवड महापालिकेकरिता, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण करिता, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ करिता, संरक्षण क्षेत्राकरिता व म्हाडाचे गृह प्रकल्पाकरिता अथवा केंद्र शासन व राज्य शासनाचे विविध प्रकल्पासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या अशा सर्व पिंपरी चिंचवड मधील प्रकल्पधारक बाधितांचे वारसदारांना नोकरीमध्ये सरळसेवा पद्धतीने नोकर भरती करताना महाराष्ट्र शासनाचे नियमानुसार असलेले राखीव आरक्षणा व्यतिरिक्त जादा २० टक्के अतिरिक्त आरक्षण राहील असा ठराव सन २०१६ मध्ये महापालिका सभेने पारित केलेला आहे.
यासर्व बाबी विचारात घेता सद्यस्थितीत महापालिका आस्थापनेवर गट ‘क’ व गट ‘ड’ मधील संवर्गातील तब्बल २७६३ पदे रिक्त आहेत. तरी या रिक्त पदांची तात्काळ भरती करण्याची मंजुरी द्यावी. त्यानुसार स्थानिक नागरिकांचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी संदीप वाघेरे यांनी केली आहे.