पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या रेसमध्ये शीतल शिंदे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. आगामी निवडणुका तोंडावर असल्यामुळे भाजपाचे जुने निष्ठावंत अशी ओळख असलेल्या शीतल शिंदे यांची निवड निश्चित मानली जात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा पहिल्यांदाच सत्तेत आली. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या नेतृत्वात महापालिकेचा कारभार सुरू झाला. मानाचे मानले जाणारे महापौर पद सलग दुसऱ्यांदा महेश लांडगे समर्थकांना मिळाले. तर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या अर्थात स्थायी समिती सभापती पदी पहिल्या वर्षी सीमा सावळे आणि दुसऱ्या वर्षी ममता गायकवाड या लक्ष्मण जगताप समर्थकांची वर्णी लागली. स्थायी समितीच्या सभापती पदाच्या दोन्ही निवडीच्या वेळेस नव्या-जुन्यांचा वाद उफाळला होता.
आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. लक्ष्मण जगताप यांनी नवा-जुना वाद संपवून संपूर्ण पक्षावर स्वत:ची पकड मजबूत केली आहे. शीतल शिंदे सध्या जगताप यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. यावेळी शिंदे यांची सभापतीपदी वर्णी लावून नव्या-जुन्या वादाची पाळंमुळं छाटून टाकण्याची खेळी जगताप खेळू शकतात. तशी फिल्डींगही त्यांनी लावली असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शीतल शिंदे यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्याचे सुत्रांकडून समजते.
शीतल शिंदे हे चिंचवड परिसरातून दुसऱ्यांदा भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांची गेल्या वर्षी स्थायी समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र समितीचे सभापतीपद न मिळाल्याने त्यांनी सदस्यपदाचा राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांची पुन्हा स्थायी समिती सदस्यपदी निवड झाल्यामुळे तेच स्थायीचे सभापती होतील, असा अंदाज बांधला जात आहे. भोसरी आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघांना स्थायीचे सभापतीपद मिळाल्याने आता शीतल शिंदे यांच्या रुपाने पिंपरी विधानसभा मतदारसंघाला सभापतीपद मिळेल, असे बोलले जात आहे.
दरम्यान आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक संतोष लोंढे यांचे नावही अचानकपणे पुढे येऊ शकते. तसेच चिंचवड मतदार संघातील जेष्ठ नगरसेविका झामाबाई बारणे आणि आरती चोंधे यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.





















Join Our Whatsapp Group